झी समूहाचे सर्वेसर्वा सुभाष चंद्रा व त्यांचे पुत्र व ‘झी’चे संचालक पुनीत गोएंका यांनी आपल्या पदाचा गैरवापर करत कंपनीतील पैशांची अफरातफर केल्याचा ठपका ठेवण्यात आलाय. भांडवली बाजार नियंत्रक संस्था असलेल्या सेबीनं या दोघांनाही संचालकपदावर राहण्यास बंदी केलीये. झी समूहाच्या कोणत्याही कंपनी अथवा उपकंपनीत ते संचालक राहू शकत नाहीत, असा अंतरिम आदेश सेबीनं सोमवारी जारी केला. तसेच या आदेशाविरोधात २१ दिवसांच्या आत त्यांना उत्तर देण्यास सांगण्यात आलेय. या वृत्तानंतर झी एन्टरटेन्मेंट एन्टरप्रायझेचे शेअर्स जोरदार आपटले.
झी एन्टरटेन्मेंट एन्टरप्रायझेसच्या शेअर्समध्ये ६ टक्क्यांपर्यंत घसरण झाली. कंपनीचे शेअर्स १८४.९५ रुपयांवर खुले झाले आणि काही वेळातच १८२.६० रुपयांवर पोहोचले. सेबीनुसार नियमांच्या कथित उल्लंघनावेळी झेडईईएलचे चेअरमन सुभाष चंद्रा आणि पुनीत गोयंका यांनी महत्त्वाच्या पदावर राहत आपल्या स्थितीचा दुरुपयोग केला आणि वैयक्तिक लाभासाठी दुसऱ्या कंपन्यांमध्ये निधीचा वापर केला. झेडईईएलनं आपला निधी संपवण्यासाठी केवळ दोन दिवसांत १३ फर्ममध्ये ते एक-एक करून पाठवले, असं सेबीनं आपल्या अंतरिम आदेशात म्हटलंय.
काय म्हटलंय सेबीनं?
सुभाष चंद्रा यांनी कंपनीच्या संचालक मंडळाला विश्वासात न घेता येस बँकेसोबत २०० कोटी रुपयांचा व्यवहार केला. तसेच समूह कंपन्यांतील अनेक कंपन्यांकडून येणे बाकी असल्याचे दाखवत त्या पैशांचा अपहार केल्याचा ठपका सेबीने ठेवला आहे. झी कंपनीचा वापर सुभाष चंद्रा यांनी पिगी बँकेसारखा केला, असाही शेरा सेबीने मारला आहे.