Join us  

Zerodha नं BSE मधील आपला हिस्सा केला कमी, पोर्टफोलिओमध्ये जोडली 'ही' मद्य तयार करणारी कंपनी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 03, 2024 11:16 AM

Zerodha Portfolio Nithin and Nikhil Kamath: पहिल्या तिमाहीतील शेअरहोल्डिंगची माहिती समोर आल्यानंतर ही बाब समोर आली. मात्र, झिरोदाच्या पोर्टफोलिओमध्ये एका मद्य तयार करणाऱ्या कंपनीचा समावेश झाला आहे.

Zerodha Portfolio Nithin and Nikhil Kamath: नितीन आणि निखिल कामथ यांच्या मालकीच्या झिरोदा (Zerodha) या कंपनीनं बीएसईमधील आपला हिस्सा कमी केला आहे. पहिल्या तिमाहीतील शेअरहोल्डिंगची माहिती समोर आल्यानंतर ही बाब समोर आली. मात्र, झिरोदाच्या पोर्टफोलिओमध्ये एका मद्य तयार करणाऱ्या कंपनीचा समावेश झाला आहे. चला तर मग झिरोदाच्या या शेअरहोल्डिंगबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

झिरोधानं बीएसईचे २३.३० लाख शेअर्स विकले आहेत. मार्च तिमाहीत कंपनीचा एकूण हिस्सा १.७२ टक्के होता. जो चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत १.४६ टक्क्यांवर आला आहे. बीएसईनं गेल्या ५ वर्षात १४७० टक्के परतावा दिला आहे. गेल्या वर्षभरात पोझिशनल गुंतवणूकदाना १३३ टक्क्यांचा फायदा झाला.

कोणत्या कंपनीत हिस्सा वाढवला?

झिरोधाने रेडिको खेतानचे १३.९० लाख शेअर्स खरेदी केले आहेत. हे कंपनीच्या १.०४ टक्के हिस्स्या इतकं आहे. रेडिको खेतानच्या पोर्टफोलिओमध्ये मॅजिक मोमेंट व्होडका, ८ पीएम व्हिस्की आणि रामपूर प्रीमियम इंडियन सिंगल माल्ट यांचा समावेश आहे. कंपनीनं या वर्षी आतापर्यंत १९ टक्के परतावा दिला आहे. तर, गेल्या वर्षभरात कंपनीच्या शेअर्सच्या किमतीत ६१ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

झिरोधाचे सहसंस्थापक निखिल कामथ यांनी आपल्या पॉडकास्टमध्ये या गुंतवणुकीचा उल्लेख केला आहे. झिरोदानं कंपनीत ४०० कोटी रुपयांची गुंतवणूक केल्याचं ते म्हणाले होते.

झिरोदाची गुंतवणूक कुठे?

कंपनीने कारट्रेड टेकमध्ये गुंतवणूक केली आहे. या कंपनीनं २०२४ मध्ये शेअर बाजारात १६ टक्के परतावा दिला आहे. गेल्या १२ महिन्यांत कंपनीच्या शेअर्सच्या किंमतीत ४८ टक्क्यांची वाढ झाली आहे. झिरोधाच्या पोर्टफोलिओचा भाग असलेल्या आरबीएल बँकेच्या शेअरमध्ये यंदा घसरण झाली आहे. या वर्षी बँकेच्या शेअरची किंमत २१ टक्क्यांनी घसरली आहे. तर फेडरल बँकेच्या शेअरमध्ये २५ टक्क्यांची वाढ दिसून आली आहे. इकॉनॉमिक टाइम्सच्या रिपोर्टनुसार, झिरोदाच्या लिस्टेड कंपन्यांचा पोर्टफोलिओ एकूण १५३६ कोटी रुपये आहे. तर कामथ बंधूंची नेटवर्थ सुमारे ४१ हजार कोटी रुपये आहे.

(टीप : यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :नितीन कामथशेअर बाजारगुंतवणूक