Zomato Payment App: गेल्या काही वर्षांमध्ये UPI अॅप्सचा (UPI Apps) वापर वाढला आहे. यामुळे विविध कंपन्या ही सुविधा सुरू करत आहेत. आता या यादीत फूड डिलिव्हरी अॅप Zomato चे नाव जोडले गेले आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) झोमॅटोला त्यांची पेमेंट सिस्टम लॉन्च करण्याची परवानगी दिली आहे. कंपनीने गुरुवारी स्टॉक एक्स्चेंज फायलिंगमध्ये याबाबत माहिती दिली.
आरबीआयकडून परवानगी मिळाल्यानंतर आता झोमॅटो PhonePay, Paytm आणि Google Pay प्रमाणे त्यांची पेमेंट सेवा सुरू करू शकणार आहे. खूप दिवसांपासून झोमॅटो यासाठी प्रयत्न करत होती.
2021 पासून कामाला सुरुवात Zomato ही नवीन सेवा त्यांची पूर्ण मालक असलेल्या Zomato Payments Private Limited (ZPPL) कंपनीद्वारे प्रदान करेल. विशेष म्हणजे कंपनीने 4 ऑगस्ट 2021 रोजी पेमेंट एग्रीगेटर व्यवसाय सुरू केला होता. एका रिपोर्टनुसार, कंपनीने UPI पेमेंट सेवा देण्यासाठी ICICI बँकेसोबत भागीदारी केली होती. तेव्हा त्यांच्याकडे परवाना नव्हता, पण आता कंपनीला RBI कडून परवाना मिळाला आहे.
दरम्यान, Zomato सह Swiggy देखील UPI लॉन्च करण्याची योजना आखत आहेत. याशिवाय, ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टनेदेखील त्यांच्या UPI वर काम सुरू केले आहे.