Join us

Zomato Shares : झोमॅटोचे शेअर्स आपटले; 'ही' आहेत २ कारणं; झाली ३ टक्क्यांची घसरण

By ऑनलाइन लोकमत | Published: November 04, 2024 1:40 PM

Zomato Shares : ऑनलाइन फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म झोमॅटोच्या शेअर्समध्ये आज जोरदार विक्रीचा दबाव दिसून आला. एकंदरीत बाजारात आज विक्रीचं वातावरण असलं तरी इतर काही कारणांमुळे झोमॅटोच्या शेअर्सवर आणखी दबाव राहिला.

Zomato Shares : ऑनलाइन फूड डिलिव्हरी (Online Food Delievery) प्लॅटफॉर्म झोमॅटोच्या शेअर्समध्ये आज जोरदार विक्रीचा दबाव दिसून आला. एकंदरीत बाजारात आज विक्रीचं वातावरण असलं तरी इतर काही कारणांमुळे झोमॅटोच्या शेअर्सवर आणखी दबाव राहिला. याचं एक कारण म्हणजे देशातील सर्वात मोठ्या डिजिटल स्क्रीन नेटवर्क अडोन्मोमधील त्याचा हिस्सा कमी झाला आहे. याशिवाय आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे त्यांच्या गोदामात अॅडव्हान्स्ड पॅकिंग डेट असलेल्या वस्तू सापडल्या. त्यामुळे शेअर्सवरील दबाव वाढला. कामकाजादरम्यान बीएसईवर शेअर २.७९ टक्क्यांनी घसरून २४२.१० रुपये (Zomato Share Price) झाला आहे. इन्ट्रा डे मध्ये तो ३ टक्क्यांनी घसरून २४१.६० रुपयांवर आला होता.

Adonmo मध्ये Zomato चा किती हिस्सा?

अॅडटेक कंपनी अडोन्मोनं २५ सप्टेंबर रोजी काही नवीन गुंतवणूकदारांकडून अतिरिक्त भांडवल उभं केलं, परंतु झोमॅटोने यामध्ये भाग घेतला नाही. या फंड रेझिंगमध्ये नवे गुंतवणूकदार अॅडव्हर्समध्ये सामील झाले आणि झोमॅटोचा हिस्सा १९ टक्क्यांवरून १७ टक्क्यांवर आला. कंपनीनं गेल्या वर्षी जानेवारी २०२२ मध्ये आपला १९.४६ टक्के हिस्सा ११२.२ कोटी रुपयांना खरेदी केला होता.

अॅडव्हान्स्ड पॅकिंग डेटचं प्रकरण काय?

झोमॅटोच्या गोदामात भविष्यातील पॅकिंग तारखा असलेले खाद्यपदार्थ सापडल्याचा दावा नुकताच मीडिया रिपोर्टमध्ये करण्यात आला होता. रिपोर्टमध्ये अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांच्या हवाल्यानं हा दावा करण्यात आलाय. २९ ऑक्टोबर रोजी केलेल्या पाहणीत झोमॅटोच्या कुकटपल्ली येथील हायपरप्योर गोदामात ३० ऑक्टोबर २०२४ चं पॅकिंग लेबल असलेलं १८ किलो मशरूम आढळून आले. याशिवाय इतरही काही त्रुटी आढळून आल्या.

शेअर्सची स्थिती कशी?

झोमॅटोच्या शेअर्सनं गुंतवणूकदारांना चांगली कमाई करुन दिली आहे. गेल्या वर्षी ३ नोव्हेंबर २०२३ रोजी झोमॅटोचा शेअर १०८.६५ रुपयांवर होता, जो त्याच्या शेअर्सचा एका वर्षातील नीचांकी स्तर आहे. या नीचांकी पातळीवरून तो १३ महिन्यांत सुमारे १७५ टक्क्यांनी वधारून २४ सप्टेंबर २०२४ रोजी २९८.२० रुपयांवर पोहोचला, जो त्याच्या शेअर्सचा उच्चांक आहे. सध्या तो उच्चांकी स्तरापेक्षा सुमारे १९ टक्क्यांनी घसरला आहे.

(टीप - यामध्ये शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :झोमॅटोशेअर बाजार