Success Story Gopal Snacks : जर मोठं यश मिळवायचं असेल तर कठोर मेहनतीशिवाय पर्याय नाही. आज आपण अशाच एका व्यक्तीची कहाणी जाणून घेणार आहोत, ज्यांनी आपल्या मेहनतीच्या जोरावर कोट्यवधी रुपयांची कंपनी उभी केली आहे. बिपीन हडवानी हे गोपाल स्नॅक्स लिमिटेडचे सीएमडी आहेत. शून्यापासून सुरुवात करून त्यांनी कोट्यवधींचा व्यवसाय उभा केलाय. १९९० मध्ये त्यांनी स्नॅक्सचा व्यवसाय सुरू करण्यासाठी वडिलांकडून साडेचार हजार रुपये उधार घेतले. त्यानंतर चार वर्षांनी त्यांनी मित्रासोबत भागीदारी तोडली आणि अडीच लाख रुपये घेऊन गोपाळ स्नॅक्सची पायाभरणी केली.
पत्नीच्या मदतीनं त्यांनी आपल्याच घराला फॅक्टरी बनवली. राजकोटच्या रस्त्यांवर सायकलवरून फिरून स्नॅक्स विकले. वाढत्या मागणीमुळे त्यांनी आपली फॅक्ट्री शहराबाहेर उभारण्याचा निर्णय घेतला. परंतु दूर असल्यानं ती बंद झाली. पण हडवानी यांनी हार मानली नाही आणि शहरात एक छोटासं युनिट सुरू केलं, जे प्रचंड यशस्वी झालं. आज गोपाल स्नॅक्स हा भारतातील चौथा सर्वात मोठा पारंपारिक स्नॅक्स ब्रँड आहे. कंपनीचं बाजार भांडवल ५,५३९ कोटी रुपये आहे.
वडिलांचं होतं छोटं दुकान
बिपीन हडवानी यांची कहाणी खऱ्या उत्कटतेचं आणि मेहनतीचं उदाहरण आहे. गावातील सामान्य कुटुंबातून आलेल्या हडवानी यांनी व्यवसाय विश्वात स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. बिपीन हडवानी यांचे वडील गावातील एका छोट्याशा दुकानातून स्नॅक्सचा व्यवसाय करायचे. गुजराती नमकीन बनवून आजूबाजूच्या गावांमध्ये सायकलवरून विकत असत. लहानपणापासूनच बिपीन यांना वडिलांच्या कामाची आवड होती. शाळा सुटल्यानंतर ते वडिलांसोबत नमकीन विकायला जात होते. इथून त्यांना व्यवसायातील बारकावे शिकायला मिळाले.
मित्रांसोबत व्यवसायाची सुरुवात
वडिलांसोबत काम केल्यानंतर बिपीन यांनी स्वत:चा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. १९९० मध्ये त्यांनी वडिलांकडून साडेचार हजार रुपये उधार घेतले आणि मित्रासोबत स्नॅक्सचा व्यवसाय सुरू केला. चार वर्षे चाललेल्या या भागीदारीनंतर दोघे वेगळे झाले. बिपीन यांना त्यांच्या वाट्यापोटी अडीच लाख रुपये मिळाले. या पैशातून त्यांनी आपली नवी सुरुवात केली.
१९९४ मध्ये बिपीन यांनी एक घर विकत घेतलं. त्यांच्या पत्नीनं त्यांना पूर्ण पाठिंबा दिला. त्यांनी आपल्या घरात गोपाल स्नॅक्सचा पहिला कारखाना बनवला. इथून ते पारंपारिक नमकीन बनवायचे. राजकोटची बाजारपेठ समजून घेण्यासाठी ते सायकलवरून दुकानदार आणि व्यापाऱ्यांना भेटत असत. त्यांची मेहनत फळाला आली आणि त्यांच्या उत्पादनांची विक्री वाढू लागली.
आज आहे कोट्यवधींची कंपनी
वाढती मागणी पाहून बिपीन यांनी शहराबाहेर प्लॉट खरेदी केला. तेथे कारखाना उभारला. मात्र, हा कारखाना शहरापासून दूर असल्यानं बंद करावा लागला. मात्र, बिपीन यांनी हार मानली नाही. कर्ज घेऊन शहरातच त्यांनी छोटेखानी युनिट सुरू केलं. हे युनिट खूप यशस्वी झाले आणि गोपाल स्नॅक्सला नव्या उंचीवर नेलं. आज गोपाळ स्नॅक्स हा भारतातील चौथा सर्वात मोठा पारंपारिक स्नॅक्स ब्रँड आहे. कंपनीचं मूल्य सुमारे ५५३९ कोटी रुपये आहे. बिपीन हडवानी यांचा हा प्रवास सर्वांसाठी प्रेरणादायी आहे.