Swiggy Instamart Rates : वाढत्या महागाईत प्रत्येकज कुठे पैसे वाचतील याचा विचार करत असतो. यातूनच भरघोस डिस्काउंट देणाऱ्या ई कॉमर्स आणि क्विक कॉमर्स सारख्या कंपन्या झपाट्याने वाढत आहेत. मात्र, आता त्याही तुम्हाला महागाईपासून वाचवू शकणार नाहीत. फूड टेक आणि किराणा डिलिव्हरी प्लॅटफॉर्म स्विगी ग्राहकांना पहिला झटका देणार आहे. स्विगी इंस्टामार्टद्वारे, मोठ्या संख्येने ग्राहक किराणा सामान, खाद्यपदार्थ किंवा इतर घरगुती वस्तू ऑर्डर करतात. आता स्विगी आपल्या इंस्टामार्ट प्लॅटफॉर्मचे वितरण शुल्क वाढवण्यावर लक्ष केंद्रित करत आहे. ३ डिसेंबर रोजी कंपनीचे मुख्य वित्तीय अधिकारी (CFO) राहुल बोथरा यांनी ही माहिती दिली.
स्विगीने डिलिव्हरी फी वाढवण्याचा निर्णय का घेतला?
मनीकंट्रोलच्या रिपोर्टनुसार, स्विगीने आपल्या इन्स्टामार्ट युनिटचा नफा वाढवण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. राहुल बोथरा म्हणाले की, जर आपण कंपनीच्या एकूण फी कंस्ट्रक्शन मॉडेलवर नजर टाकली तर, स्विगीच्या सबस्क्रिप्शन प्रोग्राम आणि वापरकर्त्यांकडून गोळा केलेल्या फीवर सबसिडी म्हणून एक निश्चित रक्कम लागू केली जाते. वेळेनुसार डिलिव्हरी शुल्क वाढण्याची गरज असते. या कारणास्तव स्विगीने इन्स्टामार्टचे वितरण शुल्क वाढवण्याची योजना आखली आहे.
किती वाढू शकतात दर?
स्विगीच्या सीएफओने माहिती दिली आहे, की कंपनी भविष्यात आपल्या इन्स्टामार्टचे दर किंवा कमिशन सध्याच्या १५ टक्क्यांवरून २०-२२ टक्क्यांपर्यंत वाढवणार आहे. यासह, प्लॅटफॉर्मवर जाहिरातींद्वारे कमाई वाढविण्याची योजना आहे. जे कंपनीचे मार्जिन वाढविण्यात उपयुक्त ठरेल. मात्र, हे बदललेले शुल्क कधीपासून लागू केले जाईल याची माहिती राहुल बोथरा यांनी दिली नाही.
स्विगीचे त्रैमासिक निकाल जाहीर
स्विगीच्या आर्थिक वर्ष २०२५ च्या दुसऱ्या तिमाहीच्या निकालांमध्ये इन्स्टामार्टचा नफा ५१३ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. जो गेल्या आर्थिक वर्षाच्या याच कालावधीत २४० कोटी रुपये होता. इन्स्टामार्ट हा स्विगीसाठी सर्वात महत्वाचा विभाग आहे. जर याची तुलना ब्लिंकिटशी केली तर स्विगीला अजून मोठा पल्ला गाठायचा आहे. कारण, झोमॅटो कंपनीच्या ब्लिंकिटचा नफा या वर्षी ११५६ कोटी रुपये आहे. यामुळेच आता स्विगीने नफा कमावण्यावर लक्ष केंद्रीत केलं आहे.
स्विगीकडून वारंवार फीमध्ये वाढ
स्विगी एप्रिल २०२३ मध्ये फूड डिलिव्हरीसाठी प्रति ऑर्डर २ रुपये आकारत होती. जी आता दीड वर्षात (सुमारे १८ महिन्यांत) प्रति ऑर्डर १० रुपये झाली आहे, म्हणजेच पूर्वीपेक्षा ५ पट शुल्कवाढ झाली आहे. कंपनीने काही महिन्यांपूर्वी खाद्यपदार्थ वितरणावरील शुल्कात आणखी वाढ केली होती.