वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जगावर लादलेल्या टॅरिफमुळे जागतिक अर्थव्यवस्था कमकुवत होईल आणि या वर्षी महागाई वाढेल, मात्र यामुळे जागतिक मंदी येणार नाही, असे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (आयएमएफ) व्यवस्थापकीय संचालक क्रिस्टलिना जॉर्जीव्हा यांनी म्हटले आहे.
आयएमएफच्या पुढील आठवड्यात जाहीर होणाऱ्या अंदाजांच्या आधारावर त्यांनी हे मत व्यक्त केले आहे. आयएमएफ प्रमुखांनी अमेरिकन प्रशासनाच्या काही चिंता व्यक्त केल्या.
जागतिक अर्थव्यवस्थेच्या लवचीकतेची परीक्षा
जागतिक व्यापारातील मोठ्या बदलांमुळे जागतिक अर्थव्यवस्थेच्या लवचीकतेची परीक्षा आहे. त्यामुळे बाजारांमध्ये भीती निर्माण झाली आहे. टॅरिफमुळे अनिश्चितता वाढते आणि ती महागात पडू शकते.
अनेक देशांमध्ये शुल्कामुळे पुरवठा साखळीतील गुंतागुंतीचा गरजेच्या वस्तूंच्या किमतीवर परिणाम होऊ शकतो. व्यापार अडथळ्यांचा विकासावर तत्काळ परिणाम होतो आणि जरी त्यामुळे देशांतर्गत उत्पादन वाढू शकते, तरी ते होण्यासाठी वेळ लागतो, असे त्या म्हणाल्या.