SBI Loan : स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) १.२५ अब्ज डॉलर्सचं कर्ज घेण्याची योजना आखत आहे. बँकेनं या वर्षी घेतलेले हे सर्वात मोठं डॉलर कर्ज असेल. या प्रकरणाशी संबंधित लोकांनी ही माहिती दिली. सीटीबीसी बँक, एचएसबीसी होल्डिंग्स आणि तैपेई फुबोन बँक एसबीआयला हे पाच वर्षांचे कर्ज मिळविण्यात मदत करत आहेत. या कर्जावर एसबीआयला सिक्युअर्ड ओव्हरनाईट फायनान्सिंग रेटपेक्षा ९२.५ बेसिस पॉईंट्स जास्त मोजावे लागतील. ओळख जाहीर न करण्याच्या अटीवर सूत्रांनी ही माहिती दिली. एसबीआय ही देशातील सर्वात मोठी बँक सरकारी आहे.
एसबीआय गुजरात शाखेमार्फत कर्ज घेणार
एसबीआय गुजरात इंटरनॅशनल फायनान्स टेक-सिटी येथील आपल्या शाखेच्या माध्यमातून हे कर्ज घेत आहे. कर्जाचे पैसे सामान्य व्यवसायाच्या गरजांसाठी वापरले जातील. मनी कंट्रोलनं यासंदर्भातील वृत्त दिलंय. याबाबत एसबीआयला पाठवलेल्या मेलला कोणताही प्रतिसाद मिळाला नसल्याचंही त्यांनी म्हटलंय. एसबीआय काही स्थानिक वित्तीय संस्थांच्या सहकार्यानं हे परकीय चलन कर्ज उभारत आहे. भारतात कडक नियमांमुळे एनबीएफसी डॉलर्समध्ये कर्ज उभारत आहेत. एनबीएफसीला आपला व्यवसाय वाढवण्यासाठी पैशांची गरज असते.
डॉलर कर्जाचं मूल्य घटलं
चोलामंडलम इन्व्हेस्टमेंट अँड फायनान्स कंपनी ३० कोटी डॉलरचं कर्ज उभारत आहे. बँक ऑफ बडोदा ७५ कोटी डॉलरचं कर्ज उभारत आहे. परदेशातून डॉलर्स कर्ज उभं करण्याचे हे प्रयत्न असूनही डॉलर कर्जाचे मूल्य यंदा २७ टक्क्यांनी घसरून १४.२ अब्ज डॉलर्सवर आलं आहे. ब्लूमबर्गच्या आकडेवारीवर ही माहिती आधारित आहे. यावर्षी डॉलरमध्ये कमी कर्ज घेण्याचे कारण म्हणजे आतापर्यंत कोणत्याही मोठ्या कंपनीनं कर्ज उचललेलं नाही. जुलैमध्ये एसबीआयनं ७५ कोटी डॉलर्सचं कर्ज उभं केलं होतं. हे तीन वर्षांचं कर्ज होतं.