trade war : सध्या एका व्यक्तीने अवघ्या जगाला वेठीस धरले आहे. ही व्यक्ती दुसरीतिसरी कोणी नसून अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आहे. ट्रम्प यांनी २ एप्रिल २०२५ पासून बहुतांश देशांवर आयात शुल्क लागू करण्याची घोषणा केली. यानंतर सर्व देशांनी तलवारी म्यान करत अमेरिकेशी वाटाघाटी सुरू केल्या. अपवाद ठरला आपला शेजारी देश चीन. आम्ही शेवटपर्यंत लढणार असे म्हणत चीननेही जशास तसे उत्तर देत अमेरिकेवर टॅरिफ वाढवला. पण, ही कृती ट्रम्प यांच्या जिव्हारी लागल्याने दोन्ही महासत्ता देशांमध्ये व्यापारी युद्धाचा भडका उडला आहे. आता अमेरिकेने चिनी वस्तूंवर २४५% कर लादला आहे. याचा अर्थ चीनमधून अमेरिकेत जाणाऱ्या वस्तूंवर २४५% पर्यंत कर भरावा लागेल. ही माहिती व्हाईट हाऊसच्या तथ्य पत्रकावरून मिळाली आहे.
अमेरिकेसमोर झुकणार नाही : चीन
'आम्हाला अमेरिकेसोबत व्यापार युद्ध नको आहे, पण त्यांच्या दबावापुढे ते गप्प बसणार नाही' अशी प्रतिक्रिया चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे. प्रवक्त्याने सांगितले की जर अमेरिकेला खरोखरच संवादाद्वारे समस्या सोडवायच्या असतील तर त्यांना दबाव आणणे थांबवावे लागेल. ते पुढे म्हणाले की, चेंडू आता वॉशिंग्टनच्या कोर्टात आहे. प्रवक्ते झांग शियाओगांग यांनी अमेरिकेचा निषेध केला आणि म्हटले की त्यांनी आपल्या सत्तेचा गैरवापर केला आहे. असं केल्याने अमेरिकेला कोणीही महान म्हणणार नाही. चीनने बोईंगचा अहवाल नाकारला आहे. वाढत्या व्यापार आणि सुरक्षा तणावाच्या पार्श्वभूमीवर बीजिंगने बोईंग जेटची डिलिव्हरी थांबवण्याचे आदेश दिल्याच्या वृत्तांची त्यांना माहिती नसल्याचे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.
दोन्ही देशांमध्ये तणाव वाढला
अमेरिकेने इतर देशांना आयात शुल्कातून ९० दिवसांची सूट दिली आहे. परंतु, चीनला त्यातून वगळले आहे. यामुळे चीन आणि अमेरिकेतील संबंधांमध्ये कटुता वाढत आहे. याचा अर्थ ट्रम्प यांचे टार्गेट चीन असल्याचे स्पष्ट होते. दोन्ही देशांमधील टॅरिफ वॉरमुळे केवळ चीन आणि अमेरिकेचेच नव्हे तर संपूर्ण जगाचे नुकसान होईल.
वाचा - शेवटच्या दिवशी क्रेडिट कार्डचं बिल भरलं तर सीबील स्कोअर खराब होतो का? काय आहे सत्य?
बोईंगचे शेअर घसरले
चीनला बोईंग विमानांच्या डिलिव्हरीवरील बंदीमुळे बोईंगच्या शेअर्सवरही परिणाम होत आहे. १५ एप्रिल २०२५ रोजी सकाळी ८:२३ वाजता, नॅस्डॅकवर, कंपनीचा स्टॉक ३.५६ टक्क्यांनी घसरून १५३.६१ अमेरिकन डॉलर्सवर व्यवहार करताना दिसला. १४ एप्रिल रोजी कंपनीचे शेअर्स १५९.२८ अमेरिकन डॉलर्सवर बंद झाले. गेल्या सत्राच्या तुलनेत आज बोईंगचा शेअर ५.६७ अमेरिकन डॉलर्सने घसरला. बोईंगचे बाजार भांडवल सध्या ११५,०२३,९१०,९२७ अमेरिकी डॉलर आहे.