Vegetable Inflation: भारतातील महागाईचा दर वाढतच असून या ऑक्टोबर महिन्यात किरकोळ महागाईचा दर रिझर्व्ह बँकेनं ठरवून दिलेल्या ६ टक्क्यांच्या उद्दिष्टाच्या वर गेला आहे. ऑक्टोबरमध्ये किरकोळ महागाई दर ६.२१ टक्क्यांवर पोहोचला असून, तो १४ महिन्यांतील उच्चांकी आहे. ऑगस्ट २०२३ नंतर पहिल्यांदाच किरकोळ महागाईनं आरबीआयची टॉलरन्स लेव्हल ओलांडली आहे. खाद्यपदार्थांच्या, विशेषत: भाजीपाल्याच्या किमती वाढल्याने महागाई वाढली.
ऑक्टोबरमध्ये भाज्यांचा महागाईदर १५ महिन्यांतील उच्चांकी १०.८७ टक्क्यांवर पोहोचला आहे. विशेषत: टोमॅटो, बटाटा आणि कांद्याच्या दरात सर्वाधिक वाढ नोंदवण्यात आली आहे. या वर्षी टोमॅटोच्या दरात १६१ टक्क्यांची वाढही दिसून आली होती. तर बटाट्याच्यादरात वार्षिक आधारावर ६५ टक्क्यांची तेजी दिसून आली होती. तर कांद्याच्या दरातही या वर्षी ५२ टक्क्यांपर्यंतची तेजी दिसून आली आहे.
घाऊक महागाईही वाढली
घाऊक महागाईतही लक्षणीयरित्या वाढ झाली असून ती २.३६ टक्क्यांवर आली आहे. तर त्यातही अन्नधान्याच्या महागाई दरातील ११.५९ टक्के महागाई दर हा चिंतेचा विषय ठरत आहे.
आरबीआयसमोरही आव्हानं
भाजीपाला, विशेषतः बटाटा-कांदा, टोमॅटोच्या दरात झपाट्यानं वाढ आहे. रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरांसमोर डिसेंबरमध्ये रिझर्व्ह बँकेच्या पतधोरणात व्याजदरात कपात करण्याचं आव्हान आहे. यामध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून बदल झालेला नाही.