Volvo Lay Off Plan : सध्या एका व्यक्तीमुळे संपूर्ण जग चिंतेत आहे. या व्यक्तीने इतर देशच नाही तर स्वतःचा देशही गोत्यात आणल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. या व्यक्ती दुसरा तिसरा कोणी नसून अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आहे. यांच्या जशास तसे आयात शुल्क धोरणामुळे सुरू झालेल्या व्यापार युद्धामुळे अनेक कंपन्यांचे गणित बिघडले आहे. बाजारातील अनिश्चितता आणि मागणीबद्दल अनेक कंपन्या अधिकाधिक चिंतेत पडत आहेत. अखेर यामध्ये एका कंपनीचा बळी गेला आहे. वाहन निर्मितीत आघाडीच्या कंपनीने ८०० कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे.
पहिला धक्का वाहन क्षेत्राला
कारपासून ट्रकपर्यंत सर्व काही बनवणाऱ्या महाकाय व्होल्वो ग्रुपने शेकडो कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याची तयारी केली आहे. वृत्तानुसार, या प्रक्रियेत ८०० कर्मचाऱ्यांच्या हाती नारळ देण्यात येणार आहे. या लोकांची यादी तयार करण्यात आली आहे.
मागणी घटण्याच्या भीतीने टाळेबंदी
रॉयटर्सच्या वृत्तानुसार, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफमुळे बाजारात अनिश्चितता वाढली असून मागणीवर त्याचा थेट परिणाम होईल, या चिंतेमुळे अनेक कंपन्या गोंधळलेल्या आहेत. अशा परिस्थितीत, व्होल्वो ग्रुपने पुढील ३ महिन्यांत त्यांच्या अमेरिकन प्लांटमधून ८०० हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याची योजना आखली आहे. कंपनी ३ प्लांटमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याची तयारी करत आहे.
या कारखान्यांमधून कर्मचाऱ्यांची कपात होणार
कंपनी पेनसिल्व्हेनियातील मॅकुंगी येथील मॅक ट्रक्स प्लांट तसेच डब्लिन आणि व्हर्जिनियामधील इतर २ प्लांटमधून कर्मचाऱ्यांची कपात करण्याची योजना आखत आहे. याअंतर्गत ५५० ते ८०० हून अधिक कर्मचाऱ्यांची यादी तयार करण्यात आली आहे. व्होल्वो ग्रुपच्या उत्तर अमेरिकन प्लांटमध्ये सुमारे २०,००० कर्मचारी काम करतात.
वाचा - मुकेश अंबानींच्या रिलायन्सपासून ते टाटा ग्रुपपर्यंत, या १० कंपन्यांनी फक्त ३ दिवसांत कमावला मोठा नफा
कंपनीला कशाची भीती?
ट्रम्प टॅरिफचा पहिला फटका कार आणि ट्रक उद्योगाला बसला आहे. व्होल्वो ग्रुपची कर्मचारी कपात याचंच द्योतक आहे. टॅरिफमुळे वाहनांच्या उत्पादन खर्चात वाढ झाल्याने कंपनी चिंतेत आहे. व्होल्वो ग्रुपच्या प्रवक्त्याने पाठवलेल्या ईमेलमध्ये म्हटले आहे की, मालवाहतुकीचे दर आणि हेवी ट्रक ऑर्डरवरील मागणी संभाव्य नियामक बदल आणि टॅरिफच्या परिणामामुळे प्रभावित होते. अशा परिस्थितीत आम्ही असे पाऊल उचलत आहोत, याबद्दल आम्हाला वाईट वाटते. आपल्या वाहनांच्या घटत्या मागणीनुसार आपल्याला उत्पादनाची सांगड घालण्याची गरज आहे.