Who is in the middle class: तुम्ही मीडल क्लास म्हणजेच मध्यमवर्गीय हा शब्द ऐकलाच असेल. पण मीडल क्लास कोण किंवा कोणाला म्हणायचं हा प्रश्नही कधीतरी तुमच्या डोक्यात येऊन गेला असेल. यासंदर्भात नुकतंच एक सर्वेक्षण करण्यात आलं. युगोव्ह-मिंट-सीपीआर मिलेनिअल्सच्या सर्वेक्षणात ८८ टक्के लोक स्वत:ला मध्यमवर्गीय मानत असल्याची माहिती समोर आलीये. मात्र, महिन्याला ५० हजार रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असणारे लोकही स्वत:ला मध्यमवर्गीय समजत असल्याचं यातून समोर आलंय.
युगोव्ह-मिंट-सीपीआर मिलेनिअल सर्व्हेमध्ये इतकं उत्पन्न असलेल्या ९० टक्के लोकांनी आपण मध्यमवर्गीय असल्याचं म्हटलं. तर महिन्याला ४ लाख रुपये उत्पन्न असलेल्या ५७ टक्के लोकांनीही स्वत:ला मध्यमवर्गीय असल्याचंच म्हटलंयय या मध्यमवर्गाला समजून घेण्यासाठी भारतात यापेक्षा चांगली चौकट आहे का? त्यासाठी निश्चित पातळीवर काम करण्याची गरज आहे.
तीन प्रकारचे भारतीय
ब्लूम व्हेंचर्सच्या म्हणण्यानुसार, भारतातील ग्राहकांची तीन श्रेणींमध्ये विभागणी केली जाऊ शकते.
पहिली श्रेणी : सुमारे ३ कोटी कुटुंबं किंवा १२ कोटी लोकांचा समावेश असलेला हा श्रीमंत वर्ग आहे. ज्यांचं दरडोई उत्पन्न सुमारे १२.३ लाख रुपये आहे आणि तो देशाचा मुख्य ग्राहक वर्ग आहे.
दुसरी श्रेणी : त्याखाली ३० कोटी लोकांचा समावेश असलेला महत्त्वाकांक्षी वर्ग आहे, ज्याचे दरडोई उत्पन्न सुमारे अडीच लाख रुपये आहे.
तिसरीश्रेणी : पिरॅमिडच्या खालच्या भागात भारताची बहुतांश लोकसंख्या राहते, जिथे कोणतंही कर्ज अथवा व्याजाची हमी देण्यायोग्य उत्पन्न नाही.
विषमता कमी व्हायला हवी
भारतातील श्रीमंत वर्गाला देशातील प्रदूषणाची चिंता नाही, ते संधी मिळताच युरोप किंवा ज्या देशांमध्ये परिस्थिती सोयीस्कर आहे अशा देशांमध्ये जात आहेत. तर दुसरीकडे मध्यमवर्गीय आणि कनिष्ठ वर्गीय लोकांना त्यांच्या जीवनावश्यक खर्चात कपात करावी लागत आहे. उत्पन्नाच्या आघाडीवर ताज्या पीरियॉडिक लेबर फोर्स सर्व्हेनुसार (पीएलएफएस) २०१७-१८ ते २०२२-२३ या कालावधीत कामगारांच्या वास्तविक वेतनात दरवर्षी केवळ ०.७ टक्के वाढ झाल्याची माहिती समोर आली आहे.