PAN 2.0 F&Q: पॅन कार्ड अपग्रेड करण्यासाठी पॅन २.० प्रोजेक्टला केंद्रीय मंत्रिमंडळाने सोमवारी मंजुरी दिली. पॅन कार्ड आता क्यूआर कोडसह देण्यात येणार आहे. अशा तऱ्हेनं ज्यांच्याकडे जुनं कार्ड आहे, त्यांना क्यूआर कोड असलेलं नवं पॅनकार्ड कसं मिळणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यांना पुन्हा अर्ज करावा लागेल का? तुमच्या मनात निर्माण होणाऱ्या या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करुया.
दरम्यान, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी यासंदर्भातील माहिती दिली. यासाठी पॅन कार्ड क्रमांक बदलण्याची गरज नाही. यावर १४३५ कोटी रुपये खर्च केले जाणार असल्याचं त्यांनी नमूद केलं.
नवीन पॅन कार्ड मिळेल का?
होय, तुम्हाला नवीन पॅन कार्ड मिळेल. सध्याच्या पॅनकार्डधारकांना काहीही बदलण्याची किंवा नवीन कार्डसाठी अर्ज करण्याची आवश्यकता नाही.
नव्या पॅन कार्डमध्ये कोणते नवे फीचर्स मिळतील?
वैष्णव यांच्या म्हणण्यानुसार, नवीन कार्डमध्ये क्यूआर कोडसारखे फीचर्स असतील. डिजिटल इंडिया अंतर्गत पॅन २.० प्रकल्प सक्षम करण्याचं सरकारचं उद्दिष्ट आहे. सरकारी यंत्रणांच्या सर्व डिजिटल प्रणालींसाठी कॉमन आयडेंटिफायर म्हणून पॅन पात्र ठरेल.
पॅन अपग्रेडेशनसाठी पैसे द्यावे लागतील का?
नाही. अश्विनी वैष्णव यांनी दिलेल्या माहितीनुसार पॅन अपग्रेडेशन विनामूल्य असेल आणि ते आपल्यापर्यंत पोहोचवलं जाईल.
नवीन पॅनकार्ड देण्याची गरज का भासली?
आतापर्यंत पॅनकार्ड ऑपरेट करणारे सॉफ्टवेअर १५ ते २० वर्षे जुनं असल्यानं अनेक समस्या निर्माण होतात. नव्या प्रणालीअंतर्गत पॅन कार्डशी संबंधित संपूर्ण यंत्रणा डिजिटल पद्धतीनं तयार करण्यात येणार असून, त्यामुळे तक्रारींचा वेळेत निपटारा करणे शक्य होणार असल्याचंही अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं.
करदात्यांसाठी याचा अर्थ काय?
जवळपास ७८ कोटी पॅन कार्ड जारी करण्यात आले आहेत. त्यापैकी ९८ टक्के लोकांकडे आहेत. पॅन २.० प्रकल्पामुळे जलद सेवा आणि कार्यक्षमतेद्वारे करदात्यांचा अनुभव सुधारेल. जलद प्रक्रियेसाठी सुलभ करदात्याची नोंदणी आणि सेवा उपलब्ध होतील.
काय होणार फायदा?
सध्याच्या पॅन/टॅन १.० इको-सिस्टीमला अपग्रेड करणं, कोअर आणि नॉन-कोर पॅन/टॅन अॅक्टिव्हिटीज आणि पॅन व्हेरिफिकेशन सर्व्हिसचे एकत्रीकरण करणं हे या नव्या प्रणालीचे उद्दिष्ट आहे. पॅन २.० चे फायदे सांगताना वैष्णव यांनी तक्रार निवारण यंत्रणा अपग्रेड केली जात असल्याचं म्हटलं. डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी पॅन डेटा व्हॉल्ट सिस्टीम बसवण्यात येत आहे. इंटिग्रेटेड पोर्टल असल्यानं इतर पोर्टलवर जाण्याची गरज भासणार नसल्याचंही त्यांनी नमूद केलं.