Zomato CEO Deepinder Goyal : काही दिवसांपूर्वी शून्य वेतनाच्या कर्मचाऱ्याच्या शोधामुळे चर्चेत आलेले झोमॅटोचे सीईओ दीपिंदर गोयल आता पुन्हा एकदा चर्चेत आलेत. झोमॅटोचे सीईओ दीपिंदर गोयल यांनी पुन्हा एकदा वेतन घेणार नसल्याची माहिती दिली. जर त्यांनी वेतन घेतलं असतं तर त्यांना कंपनीकडून वर्षाला ३.५ कोटी रुपये मिळाले असते. दीपिंदर गोयल हे २०२१ पासून वेतन घेत नाहीयेत. क्वालिफाईड इन्स्टिट्युशनल प्लेसमेंटच्या कागदपत्रांनुलाप ३६ महिन्यांपर्यंत त्यांनी कोणतंही वेतन घेतलेलं नाही.
मार्च २०२६ पर्यंत वेतन घेणार नाही
नुकत्याच घेतलेल्या निर्णयावरून एक गोष्ट स्पष्ट झाली आहे की, दीपिंदर गोयल पुढील २ वर्षे कंपनीत आपल्या कामाच्या मोबदल्यात कोणतंही वेतन घेणार नाहीत. मार्च २०२१ आणि एप्रिल २०२४ मध्ये बोर्डाला सादर केलेल्या पेपर्समधून ही माहिती समोर आली आहे.
पगार सोडल्यानंतरही दीपिंदर गोयल कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ पदावर कायम राहतील. त्यांना कंपनीकडून व्हेरिएबल्स मिळत राहतील. सध्या कंपनीत दीपिंदर गोयल यांचा एकूण हिस्सा ४.१८ टक्के आहे. २५ नोव्हेंबरपर्यंत त्याचं मूल्य १० हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त होतं.
कंपनी निधी उभारणार
झोमॅटोनं क्वालिफाइड इन्स्टिट्यूशनल प्लेसमेंटच्या (QIP) माध्यमातून भांडवल उभारण्यासाठी एक इश्यू आणला आहे. इश्यूची फ्लोअर प्राइस २६५.९१ रुपये प्रति शेअर निश्चित करण्यात आलीये. सोमवारी हा इश्यू खुला झाला. क्यूआयपी ऑफरच्या माध्यमातून ८,५०० कोटी रुपये उभारण्याची कंपनीची योजना असल्याचं कंपनीनं यापूर्वी सांगितलं होतं.
संचालक मंडळाच्या निधी उभारण्याच्या समितीनं यासाठी मंजुरी दिली असल्याची माहिती कंपनीनं सोमवारी शेअर बाजाराला दिली. इश्यूची फ्लोअर प्राइस २६५.९१ रुपये प्रति शेअर निश्चित करण्यात आली आहे.