Zomato QIP : फूड डिलिव्हरी आणि क्विक कॉमर्स लीडर झोमॅटो लिमिटेड (Zomato Ltd) डिसेंबरमध्ये १ अब्ज डॉलर्सची क्यूआयपी लाँच करण्याच्या तयारीत आहे. कंपनीनं आपल्या प्रस्तावित क्वालिफाइड इन्स्टिट्यूशनल प्लेसमेंटवर (QIP) काम सुरू केलं असून त्यासाठी इन्व्हेस्टमेंट बँक मॉर्गन स्टॅनलीचीही नियुक्ती केली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. या ऑफरच्या माध्यमातून ८,५०० कोटी रुपये उभारण्याचा कंपनीचा मानस आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या क्यूआयपीसाठी आणखी एक किंवा दोन इन्व्हेस्टमेंट बँकांचीही नियुक्ती केली जाऊ शकते. मनीकंट्रोलनं यासंदर्भातील वृत्त दिलंय. या डीलची साईज ८० कोटी डॉलर्स ते १ अब्ज डॉलरच्या दरम्यान असू शकतो. झोमॅटोच्या प्रवक्त्याने याबाबत प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. मॉर्गन स्टॅनलीला पाठवलेल्या ई-मेललाही प्रतिसाद मिळाला नसल्याचं मनी कंट्रोलनं म्हटलंय.
झोमॅटोची स्पर्धक कंपनी स्विगी लिमिटेडनं नुकताच ११,३२७ कोटींचा आयपीओ लाँच केला आहे. १३ नोव्हेंबर रोजी स्विगीचं लिस्टिंग ७.६९ टक्के प्रीमिअमवर झालं. नॅशनल स्टॉक एक्स्चेंजवर (एनएसई) कंपनीचा शेअर ४२० रुपयांवर लिस्ट झाला, तर आयपीओची किंमत ३९० रुपये होती. झोमॅटोचा शेअर २४ सप्टेंबर रोजी ५२ आठवड्यांच्या उच्चांकी पातळीवर २९८.२ रुपयांवर पोहोचला होता. त्यानंतर कंपनीच्या शेअरमध्ये ९.६ टक्क्यांची घसरण झाली आहे. या कॅलेंडर वर्षात आतापर्यंत कंपनीच्या शेअरमध्ये जवळपास ११८ टक्क्यांची वाढ झाली आहे.
(टीप : यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)