नवी दिल्ली : फूड डिलिव्हरी कंपनी झोमॅटो (Zomato) ऑनलाइन ऑर्डरद्वारे लोकांच्या घरीपर्यंत दारू पोहोचविण्यासाठी तयारी करत आहे. तिसऱ्या लॉकडाऊनमध्ये देशात दारूची दुकाने उघडण्यास केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. त्यामुळे दारू खरेदीसाठी अनेक दुकांनाबाहेर ग्राहकांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे झोमॅटो कंपनी लोकांची गर्दी टाळण्यासाठी दारूची ऑनलाइन डिलिव्हरी करण्यासाठी प्रयत्नशील आहे.
वृत्तसंस्था रॉयटर्सच्या माहितीनुसार, झोमॅटो कंपनीने दारूची होम डिलिव्हरी करण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्पिरिट्स अँड वाईन असोसिएशन ऑफ इंडियाला (आयएसडब्ल्यूएआय) प्रस्ताव दिला आहे. लॉकडाऊनमुळे झोमॅटो कंपनीचा फूड डिलिव्हरीचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात घसरला आहे. त्यामुळे झोमॅटो कंपनीला या नव्या व्यवसायात उतरून आपले अस्तित्व टिकवून ठेवायचे आहे. नुकतेच झोमॅटो कंपनीने किराणा मालाची होम डिलिव्हरी देखील सुरू केली आहे.
कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाऊनचा पहिला टप्पा 25 मार्च रोजी लागू केला. त्यानंतर दारूचा व्यवसाय पूर्णपणे ठप्प होता. मात्र, दारूची दुकाने बंद असल्यामुळे राज्यांना मिळणाऱ्या महसूलात मोठी घट झाली. त्यामुळे केंद्र सरकारकडून लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यात म्हणजचे 4 मे पासून दारूची दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात आली. मात्र, दारूची दुकाने उघडल्यानंतर देशातील अनेक राज्यांत लोकांची दुकानांवर प्रचंड गर्दी आणि लांबच लांब रांगा लागल्याचे दिसून आले.
दरम्यान, भारतात सध्या तरी दारूची होम डिलिव्हरी करण्यास परवानगी नाही. मात्र, सध्या अनेक कंपन्या दारूची होम डिलिव्हरी करण्यासाठी सरकारने सूट द्यावी, यासाठी दबाव आणत आहेत. यासाठी आयएसडब्ल्यूएआय जोरदार लॉबिंग करीत आहे. जर ही सूट दिली गेली तर झोमॅटो कंपनी दारूची होम डिलिव्हरी सुरू करू शकेल.
अनेक राज्यांत दारूवरील कर वाढविला आहे. दिल्ली सरकारने दारूवर 70 टक्के विशेष कोरोना शुल्क आकारले आहे. रॉयटर्सला झोमॅटोद्वारे पाठविण्यात आलेल्या प्रस्तावाची कागदपत्रे मिळाली आहेत. ज्यामध्ये झोमॅटो फूड डिलिव्हरी विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मोहित गुप्ता यांनी म्हटले आहे की, "आम्हाला वाटते की टेक्नॉलॉजी आधारित होम डिलिव्हरीच्या पर्यायामुळे दारूच्या विक्रीत वाढ होऊ शकते."