अनादी काळापासून भारताला नृत्याची महान परंपरा लाभली आहे. आजकाल रिअॅलिटी शोच्या माध्यमातून नृत्यप्रकार अगदी घराघरात पोहोचले आहेत. नृत्य हा पूर्णवेळ व्यवसाय असू शकतो, हेच मुळात कित्येकांना माहीत नसायचे. मात्र, आता परिस्थिती बदलते आहे. नृत्यकलेकडेसुद्धा एक चांगला करिअरचा पर्याय म्हणून पाहिले जाऊ लागले आहे. तरुण पिढी या क्षेत्राकडे मोठ्या प्रमाणात वळते आहे.नृत्य क्षेत्रात करिअर करण्यासाठी किमान बारावी पास असणे अनिवार्य आहे. तसे पाहता, या क्षेत्राशी शिक्षणाचा संबंध कमी प्रमाणात येतो. हे क्षेत्र कौशल्यावर आधारित आहे. रिदमची समज, नृत्यातील सादरीकरणाचे टप्पे या गोष्टींना फार महत्त्व असते. आता यात पदवी आणि पदविकाही घेता येते. पीएच.डी ही पदवीही संपादन करता येते. बऱ्याचदा कलाकारांना ९-५ नोकरी करायला आवडत नाही, पण डान्स क्लास हा चांगला पर्याय ठरतो. नृत्यवर्गामुळे नियमित दरमहा विद्यार्थ्यांकडून फी मिळते, शिवाय डान्स क्लासबरोबर नृत्यसादरीकरण करणेही शक्य होते. आजकाल बहुतांश शाळांमध्ये नृत्य हा शैक्षणिक विषय म्हणून सामावून घेतला आहे. त्यामुळे विविध शाळांमध्येही नृत्य शिक्षकाची नोकरी करता येऊ शकते.मुलांच्या मानसिकतेचा विचार करून, त्यांच्या कलाने घेऊन, त्यांच्यात नृत्याची गोडी निर्माण करणे, त्यांच्याकडून कार्यक्रमांची तयारी करून घेणे इ. अनेक गोष्टींची कसरत नृत्यगुरूला करावी लागते. अनुभव मात्र, नृत्यगुरूसाठी खूप महत्त्वाचा समजला जातो. विद्यार्थ्यांना शिकविल्याने नृत्यगुरू कलाकार म्हणूनही अधिक समृद्ध होतो, विद्यार्थ्यांकडूनही खूप शिकायला मिळते, हे मात्र निर्विवाद सत्य आहे! इतर विषयांप्रमाणे नेट-सेटची परीक्षा नृत्य विषयात उत्तीर्ण झाल्यावर, विविध नृत्य महाविद्यालयांत व विद्यापीठांतही नृत्यशिक्षक म्हणून नेमणूक होऊ शकते.चित्रपटांमध्ये, पुरस्कार सोहळ्यांमध्ये पार्श्वनर्तक म्हणून नृत्य करणे हादेखील एक मोठा करिअरचा पर्याय आहे. असे अनेकविध पर्याय नृत्यक्षेत्रात उपलब्ध आहेत. त्याचप्रमाणे, कलाकार अजून वेगवेगळ्या करिअरच्या संधी नृत्यात निर्माण करत आहेत. इतर क्षेत्रांप्रमाणेच हेदेखील झपाट्याने वाढणारे आणि आर्थिकदृष्ट्याही स्थिरता देणारे क्षेत्र आहे.नृत्याचे दोन प्रकार पडतात. शास्त्रीय अथवा क्लासिकल आणि दुसरा लोकनृत्य अथवा फोकडान्स. या अभ्यासक्रमात सामान्य ज्ञानाबरोबर नृत्याच्या इतिहासाबद्दल शिकविले जाते. काही प्रमाणपत्र अभ्यासक्रमही उपलब्ध आहेत. पदव्युत्तर पदवी घेण्याच्या संधी अनेक विद्यापीठांत आहेत. नृत्य शिकविण्याबरोबर त्यातील बारकावे, धून ऐकून स्टेप शिकणे आदी बाबी त्यात समाविष्ट असतात. प्रात्यक्षिकाला फार महत्त्व राहते.हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर कला केंद्र, विविध टी.व्ही. चॅनेल, वेगवेगळ्या नृत्यसमूहात काम करू शकता. अनेक नृत्य महोत्सव जगभरात भरत असतात, त्यातही सहभागी होता येते. मालिका, अल्बम, चित्रपट नृत्यदिग्दर्शक, नृत्योपचार तज्ज्ञ म्हणूनही काम मिळेल. नेट सेट परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर अध्यापनही करता येते. परदेशात भारतीय नृत्य शिक्षकांना चांगली मागणी आहे. ज्यांचा स्वभाव उद्योगी आहे, ते स्वत:ची नृत्य संस्था काढू शकतात. आजकाल रिअॅलिटी शोसाठी नृत्य प्रशिक्षक हवे असतात. आता छोट्या शहरांतही कामाच्या संधी उपलब्ध आहेत.
नृत्य क्षेत्रातही मोठे करिअर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2018 2:06 AM