नवी दिल्ली: कोरोना काळातून हळूहळू देश सावरू लागला आहे. कोरोना काळात लाखो जणांच्या नोकऱ्या गेल्या. मात्र, आता अनेकविध क्षेत्रात नोकरभरतीची प्रक्रिया राबवली जात आहे. सरकारी असो वा खासगी क्षेत्र मोठ्या प्रमाणावर नोकऱ्यांच्या संधी उपलब्ध होताना दिसत आहेत. बँकिग क्षेत्रात नोकरीच्या संधी शोधत असलेल्यांसाठी शुभवार्ता असून, एका बँकेत भरती प्रक्रिया राबवण्यास सुरुवात झाली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख, पदे, पदांची संख्या काय, ते जाणून घ्या... (CBOI Recruitment 2022)
सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये स्पेशालिस्ट ऑफिसर पदाची भरती केली जाणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले असून, पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अनुभव, अर्जाची शेवटची तारीख यांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्जामध्ये काही त्रुटी असल्यास किंवा दिलेल्या मुदतीनंतर आल्यास अर्ज बाद करण्यात येईल याची उमेदवारांनी नोंद घ्यावी, असे सांगितले जात आहे.
किती आणि कोणत्या पदांसाठी होतेय भरती?
सेंट्रल बँक ऑफ इंडियाअंतर्गत विशेषज्ञ अधिकारी आयटी आणि सिनिअर मॅनेजर पदाच्या एकूण १९ जागा भरण्यात येणार आहेत. स्पेशलिस्ट ऑफिसर इन्फोर्मेशन टेक्नोलॉजी, सिनिअर मॅनेजर पदासाठी अर्ज करु इच्छिणाऱ्या उमेदवाराकडे सायन्स / आयटी / ईसीई किंवा एमसीए / एमएससी (आयटी) / एमएससीपर्यंतचे शिक्षण पूर्ण असणे आवश्यक आहे. उमेदवाराला संबंधित कामाचा ६ वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे. शेल स्क्रिप्टींग, युनिक्स फाइल सिस्टिम मॅनेजमेंट, युनिक्स पॅच मॅनेजमेंटचा अनुभव असावा. तसेच काम एकट्याने हाताळता यावे. यासाठी उमेदवाराचे वय ३५ वर्षापर्यंत असावे.
पगार आणि शेवटची तारीख काय?
सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख २ मार्च २०२२ असल्याचे सांगितले जात आहे. सदर पदांसाठी निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना ६३ हजार ८४० ते ७८ हजार २८० पर्यंत पगार मिळू शकणार आहे. खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी ८५० रुपये अधिक जीएसटी असा अर्ज शुल्क भरावा लागणार आहे. एससी/एसटी/पीडब्ल्यूबीडी उमेदवारांसाठी १७५ रुपये अधिक जीएसटी इतका इर्ज शुल्क भरावा लागणार आहे.
दरम्यान, पदभरतीसाठी अर्ज करताना उमेदवारांनी रेझ्युमे, दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रे, शाळा सोडल्याचा दाखला, जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी), ओळखपत्र आणि पासपोर्टसाइझ फोटो अशी कागदपत्रे सोबत जोडणे आवश्यक आहे.