सगळीकडे पुढे, पण पैशाच्या गणितात बायका मागे का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2017 06:09 PM2017-08-22T18:09:30+5:302017-08-22T18:15:02+5:30
पैशाच्या व्यवस्थापनासंदर्भात स्त्रिया नेमक्या काय चुका करतात?
- मयूर पठाडे
महिलांच्या कर्तृत्वाला कोणीही बांध घालू शकत नाही आणि त्यांना थोपवू शकत नाही, हे काय आता सांगायला हवं? असं एकही क्षेत्र नाही, जिथे त्यांनी आपला झेंडा रोवला नाही.. असं एकही क्षेत्र नाही, ज्या ठिकाणी कोणी बोट दाखवू शकेल..
पण.. असं असलं तरी एका गोष्टीत मात्र महिला कायम मागे पडत असल्याचं दिसतं. भले त्या आकाशीचे चंद्र-सूर्य तोडून आणतील, पण आपल्या फायनान्शिअल मॅनेजमेंटमध्ये त्या कमी का पडतात? पैशांचं योग्य व्यवस्थापन करण्याकडे त्या लक्ष का देत नाहीत? आपल्याच हक्काच्या पैशाकडे आणि प्रॉपर्टीकडे त्या जाणीवपूर्वक का बघत नाहीत? अगदी त्या स्वत: कमावत्या असल्या, उच्च पदावर असल्या तरीही पैशांच्या व्यवस्थापनाकडे त्या फारसं लक्ष देत नाहीत.
का होतं असं?
लहानपणापासून एकतर वडील, भाऊ नाहीतर नवरा यांच्याकडेच पैशाचं व्यवस्थापन असल्याचं आपण पाहतो. महिलांनही ते विनातक्रार मान्य केल्याचं बºयाचदा दिसतं. सगळ्याच महिला या व्यवस्थापनाकडे दुर्लक्ष करतात असं नाही, पण सर्वसाधारणपणे असं चित्र मात्र नेहेमी पाहायला मिळतं..
कोणत्या आहेत या चुका?
१- महिला घरात अगदी प्रत्येकाचं करतील, जाणीवपूर्वक लक्ष देतील, पण पैशाची वेळ आली की, ती गोष्ट मात्र कायम त्यांच्या लिस्टमध्ये शेवटच्या क्रमांकावर असते. त्याच्यासाठी त्यांच्याकडे वेळच नसतो. ही गोष्ट त्यांनी टाळायला हवी. कारण वेळ म्हणजेदेखील पैसाच आहे.
२- पैशाच्या व्यवस्थापनाच्या बाबतीत त्या जणू काही निरक्षरच आहेत असं वाटावं अशीच त्यांची भूमिका असते. पैशांचे सारे व्यवहार महिलांना माहीतच हवेत. अगदी नोकरीतदेखील आपल्याला कोणत्या सोयी-सवलती आहेत, याकडे महिला फारसं लक्ष देत नाहीत. त्या सवलतींचा वापर महिलांनी करायला हवा. वेगवेगळे इन्शुरन्स माहीत करून घ्यायला हवेत. अडचणीच्या वेळी कुठून पैसे उपलब्ध होतील याची खातरजमा करायला हवी.
३- पैशांच्या व्यवहारांच्या बाबतीत कोणतीच पूर्वतयारी बºयाचदा महिलांनी केलेली नसते. नवरा बघतोय ना सगळं काही, मग आपल्याला त्यात लक्ष घालायची गरज नाही, असं त्यांना वाटत असतं, पण अलीकडे घटस्फोटांचं प्रमाण खूप वाढलं आहे, अचानक एखाद्या वेळी पतीचा मृत्यूही होऊ शकतो, दुर्दैवानं असं काही घडलं की काय करायचं असा मोठाच प्रश्न त्यांच्यापुढे उभा राहतो. तो टाळण्यासाठी सजग राहाणं गरजेचं आहे.
४- आपण स्वत: कमावलेल्या पैशांचही व्यवस्थापन बºयाचदा महिला करीत नाहीत. त्याचा नंतर तोटाच होतो.
५- लग्न झाल्यानंतरही आपल्या स्वत:च्या नावावर काही प्रॉपर्टी आहे की नाही याकडे महिलांनी लक्ष द्यायला हवं. जॉर्इंट प्रॉपर्टीकडेही लक्ष द्यायला हवं. आपल्याला स्वाक्षरीचा अधिकार आहे की नाही हेही तपासून त्याप्रमाणे बदल करुन घ्यायला हवेत.
६- समजा नाही समजत आपल्याला पैशांचं गणित फारसं, पण मग त्यासाठी फायनान्शिअल अॅडव्हायझरचा सल्ला तर आपल्याला घेता येतो ना?
- तो घ्या आणि आपला पैसा सुरक्षित ठेवा, वाढवा..