मुंबई - शिक्षण झाल्यानंतर प्रत्येक युवक असो वा युवती सरकारी नोकरी मिळविण्यासाठी धडपड करत असतात. या तरुणांसाठी पश्चिम रेल्वेने ३५५३ अप्रेंटिस पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. ७ जानेवारीपासून ६ फेब्रुवारीपर्यंत या पदांसाठी अर्ज करता येणार आहे. यासाठी तुम्हाला १० वी परीक्षा ५० टक्के गुणांसह उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. तसेच संबंधित आयटीआय ट्रेड प्रमाणपत्राचीही गरज भासणार आहे.
रेल्वेने प्रसिद्ध केलेल्या या जाहिरातीच्या अधिक माहितीसाठी http://bit.ly/39MhTvd या लिंकवर जाऊन माहिती घेऊ शकतात. ऑनलाइन पद्धतीने हे अर्ज रेल्वेकडे भरु शकता. त्यासाठी तुमच्या वयाची १५ वर्ष पूर्ण झालेली असावी तर २४ वयापेक्षा अधिक असलेल्या व्यक्तींना अर्ज करता येणार नाही. मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी ही अट ५ वर्षासाठी वाढवून दिली आहे. वेल्डर, कारपेंटर, टर्नर, मॅकेनिक आणि संगणक ऑपरेटर अशा विविध पदांसाठी हे अर्ज मागविण्यात आले आहेत.
तर ऑनलाइन अर्जासोबत तुम्हाला १०० रुपये फी भरावी लागणार आहे. महिला उमेदवार आणि एससी, एसटी, इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी मोफत अर्ज करता येणार आहे. पश्चिम रेल्वेच्या जाहिरातीनुसार कोणत्याही अर्जदाराला सरकारमान्य बोर्डाची दहावीची परीक्षा ५० टक्क्यांनी उत्तीर्ण असणं गरजेचे आहे. या संपूर्ण प्रक्रियेनंतर १३ फेब्रुवारीला पात्र असलेल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात येईल. २८ फ्रेबुवारीपासून निवड केलेल्या उमेदवारांच्या कागदपत्रांची छाननी केली जाईल तर १ एप्रिल २०२० पासून अप्रेंटिस सुरु करण्यात येईल. १ वर्षासाठी तुम्हाला प्रशिक्षण दिलं जाणार आहे.