१० वी पास आहात? Post Office मध्ये नोकरीची सुवर्ण संधी! ३८,९२६ पदे भरणार; जाणून घ्या
By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2022 11:24 AM2022-05-03T11:24:07+5:302022-05-03T11:24:36+5:30
पोस्ट ऑफिसमध्ये रिक्त जागांसाठी मोठ्या प्रमाणात भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. पाहा, डिटेल्स...
नवी दिल्ली: देशवासीयांचा सर्वांत विश्वासू मानल्या जाणाऱ्या पोस्ट ऑफिसमध्ये (Post Office) नोकरीची मोठी संधी प्राप्त झाली आहे. नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी शुभवार्ता आहे. कोरोना संकटातून हळूहळू सर्वच क्षेत्रे पूर्वपदावर येताना पाहायला मिळत आहेत. सार्वजनिक असो वा खासगी क्षेत्रात नोकऱ्यांच्या अनेकविध संधी प्राप्त होताना दिसत आहेत. इंडिया पोस्टने ग्रामीण डाक सेवक आणि इतर पदांच्या भरतीसाठी अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. पोस्ट ऑफिसच्या अधिकृत संकेतस्थळावर यासंदर्भातील नोटिफिकेशन पाहू शकता.
अधिकृत अधिसूचनेनुसार, पोस्ट ऑफिसच्या या भरती प्रक्रियेद्वारे भारत पोस्टमध्ये शाखा पोस्टमास्टर, असिस्टंट शाखा पोस्ट मास्टर आणि डाक सेवक यांच्या ३८,९२६ रिक्त पदांची भरती केली जात आहे. शाखा पोस्ट मास्टर पदांसाठी निवडलेल्या उमेदवारांना दरमहा १२ हजार रुपये वेतन दिले जाईल. तर, इतर पदांसाठी, उमेदवारांना दरमहा १० हजार रुपयांपर्यंत पगार मिळेल. २ मे रोजी ही भरती प्रक्रिया सुरू झाली असून, अर्ज करण्याची शेवटची तारीख ५ जून आहे.
१० वी पास उमेदवार करू शकतात अर्ज
भारतीय पोस्टमधील या पदांच्या भरतीसाठी उमेदवाराचे किमान वय १८ वर्षे आणि कमाल वय ४० वर्षे निश्चित करण्यात आले आहे. तथापि, सरकारी नियमांनुसार, राखीव प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयोमर्यादेची सवलत दिली जाईल. याशिवाय, या पदांच्या भरतीसाठी उमेदवाराने मान्यताप्राप्त बोर्डाची इयत्ता १० वी किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. तपशीलवार माहितीसाठी उमेदवार अधिकृत अधिसूचना पाहू शकतात.
दरम्यान, सर्व पात्र उमेदवार इंडिया पोस्ट GDS भरती २०२२ साठी अधिकृत वेबसाइट indiapostgdsonline.gov.in वर ५ जून २०२२ पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात. यासाठी उमेदवारांना १०० रुपये अर्ज शुल्क भरावे लागणार आहे.