IT Sector Hiring: आयटी प्रोफेशनल्ससाठी दिलासादायक बातमी! 3.6 लाख कर्मचाऱ्यांची भरती करण्याच्या तयारीत कंपन्या
By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2022 01:36 PM2022-02-18T13:36:19+5:302022-02-18T13:37:14+5:30
IT Sector Hiring : रिपोर्टनुसार, चालू आर्थिक वर्षात नोकरी गमावण्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे.
नवी दिल्ली : आयटी (IT) प्रोफेशनल्ससाठी दिलासादायक बातमी आहे. एका रिपोर्टनुसार आयटी क्षेत्रात 3.6 लाख नोकर भरती होणार आहे. नुकत्याच आलेल्या एका रिपोर्टनुसार, कंपन्या चालू आर्थिक वर्षात मोठ्या संख्येने फ्रेशर्सची नियुक्ती करण्याचा विचार करत आहेत.
रिपोर्टनुसार, चालू आर्थिक वर्षात नोकरी गमावण्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. आयटी क्षेत्रातील नोकऱ्या कमी होण्याचे प्रमाण तिसऱ्या तिमाहीत (ऑक्टोबर-डिसेंबर) 22.3 टक्के होते, जे दुसऱ्या तिमाहीत (जुलै-सप्टेंबर) 19.5 टक्के होते.
चौथ्या तिमाहीत (जानेवारी-मार्च) हा दर 22 ते 24 टक्क्यांपर्यंत राहण्याची शक्यता आहे, असा अंदाज रिपोर्टमध्ये आहे. तसेच, चिंतेची बाब ही आहे की, आयटी क्षेत्रातील पगारात सतत वाढ होत आहे, तर अॅट्रिशन रेटमध्ये घसरण होत नाही आहे. त्यात म्हटले आहे की, कोरोनाचा प्रादुर्भाव असूनही आयटी क्षेत्रात तेजी आहे.
म्हणजेच या क्षेत्रावर महामारीचा विशेष प्रभाव नाही. रिपोर्टनुसार, या वर्षी महसुलातही मोठी झेप होईल आणि कंपन्या मोठ्या प्रमाणावर भरती करतील. चालू आर्थिक वर्षात आयटी क्षेत्रासाठी महसूल वाढ 19 ते 21 टक्क्यांच्या दरम्यान असेल, जी इतिहासातील सर्वाधिक असेल. आर्थिक वर्ष 2023-24 पर्यंत ही वाढ कायम राहील, असेही म्हटले आहे.
सहा कंपन्यांमध्ये सर्वाधिक भरती
नुकत्याच जारी झालेल्या एका रिपोर्टमध्ये असे म्हटले आहे की, नामांकित सहा आयटी कंपन्यांनी आर्थिक वर्ष 2022 मध्ये 2.15 लाख पदवीधरांना फ्रेशर्स म्हणून कंपनीत नियुक्त केले आहे, गेल्या वर्षीची आकडेवारी पाहता, हा आकडा 99,000 पेक्षा थोडा जास्त होता. रिपोर्टनुसार, कॉग्निझंट, एचसीएल टेक, विप्रो आणि टेक महिंद्रा या कंपन्या मिळून येत्या वर्षासाठी 1.4 लाख फ्रेशर्सची नियुक्ती करण्याची तयारी करत आहेत.
भारतीय आयटी बाजार वाढेल
भारतीय आयटी सेवा बाजार 230 अब्ज डॉलरहून 240 अब्ज डॉलरपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे. जो प्रामुख्याने नामांकित 15 ते 20 भारतीय आयटी कंपन्यांच्या वाढीमुळे प्रेरित आहे. नॅसकॉमच्या ताज्या रिपोर्टमध्ये असेही म्हटले आहे की पुढील आर्थिक वर्ष देखील आयटी क्षेत्रासाठी उत्कृष्ट असेल. पुढील वर्षीही डिजिटल मागणी कायम राहील, त्यामुळे हे क्षेत्र वेगाने वाढेल. 2026 पर्यंत या इंडस्ट्रीचा आकार 350 बिलियन डॉलर होईल.