JOB Alert: मराठी, हिंदी येतेय? बास, काम झालेच म्हणून समजा; गेमिंग कंपनी Winzo खोलणार नोकऱ्यांचा पेटारा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2022 09:34 PM2022-04-17T21:34:33+5:302022-04-17T21:35:34+5:30
विंझो पुढील वर्षभरात एक लाखांहून अधिक रोजगार उपलब्ध करणार आहे. विविध कामांसाठी गृहीणी, टीचर्स आणि इफ्लूएंसरना सोबत घेतले जाणार आहे.
मोबाईलवर गेम खेळून कोणाला पैसे मिळालेत असे ऐकिवात नाही, असलेच तरी हाताच्या बोटावर मोजण्याएवढे. परंतू गेम खेळणाऱ्यांमुळे तुम्हाला पैसे मिळत असतील तर... तुम्ही म्हणाल काय हे, लोक गेम खेळणार आणि आम्हाला पैसे मिळणार कसे काय? होय गेमिंग स्टार्टअप विंजो (Winzo) मराठी, हिंदी, इंग्रजीसह अन्य भाषा बोलणाऱ्यांना भरघोस पैसे देणार आहे.
विंझो पुढील वर्षभरात एक लाखांहून अधिक रोजगार उपलब्ध करणार आहे. ही थेट नोकरी असेल किंवा रोजगाराच्या स्वरुपात असेल. हा दावा कंपनीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने केला आहे. कंपनीच्या को-फाऊंडर सौम्या सिंह राठोड यांनी म्हटले आहे की, गेम्सच्या संख्येत वाढ केली जाणार आहे. त्यानुसार लोकांना याच्याशी जोडले जाणार आहे. विविध कामांसाठी गृहीणी, टीचर्स आणि इफ्लूएंसरना सोबत घेतले जाणार आहे. पुढील वर्षांत ही संख्या वाढत जाणार आहे.
नेमके काम काय?
विंजो ही कंपनी हिंदी, गुजराती, मराठी, बांग्ला, इंग्रजी यासह १२ भाषांमध्ये गेम्स उपलब्ध करते. या गेम्सना त्या भाषेतील आवाज, टेक्स्ट लागते. कंपनीचे सध्या ८ कोटी युजर्स आहेत. या युजर्सना त्यांच्या भाषेत आवाज उपलब्ध करून देणे हे या गृहीणी, शिक्षक आणि अन्य लोकांचे काम असणार आहे. असे लाखभर लोक कंपनीला लागणार आहेत.
राठोड यांनी सांगितले की, २ वर्षांपूर्वी विंझोसोबत 25,000 लोक काम करत होते. त्यांना सरासरी ३० ते ४० हजार रुपये दर महिन्याला मिळत होते. आता ही संख्या लाखावर गेली आहे आणि ते सरासरी ७५००० रुपये ते एक लाख रुपये कमवत आहेत. ही संख्या पुढील वर्षात दुप्पट होईल आणि उत्पन्नही दुप्पट ते अडीजपट वाढेल.
या प्लॅटफॉर्मने अनेक अनुवादकांना प्रोजेक्ट बेसिसवर जोडले आहे. दोन वर्षांपूर्वी विंजो 300-400 अनुवादकांसोबत काम करत होते. आता देशभरात 7 हजारावर भाषांतर करणारे आहेत. अनुवादकांना महिन्याला सरासरी 35-50 हजार रुपये मिळतात. ही संख्या दीड ते दुपटीने वाढणार असल्याचे राठोड म्हणाल्या.