नवी दिल्ली-
मुली कोणत्याच बाबतीत आता मुलांपेक्षा कमी राहिलेल्या नाहीत. मुलांच्या खांद्याला खांदा लावून मुलीही सर्वच क्षेत्रात आघाडीवर असल्याचं आपण पाहात आलो आहोत. याचच एक उदाहरण पटनाच्या एनआयटीच्या अदिती तिवारीनं दाखवून दिलं आहे. फेसबुककडून चक्क १ कोटी ६० लाखांचं पॅकेज घेऊन तिनं नवा विक्रम केला आहे. अदितीनं अभूतपूर्व यश संपादन केलं आहे. ती इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशनच्या अंतिम वर्षाची विद्यार्थिनी आहे. आता फेसबुकमध्ये ती फ्रंट एंड इंजिनिअर म्हणून काम करणार आहे.
अदितीला एवढं मोठं पॅकेज मिळाल्यानं पटना एनआयटीचा विक्रम मोडीत निघाला आहे. ही कामगिरी केल्यानंतर कॉलेजचा गेल्या पाच वर्षांचा विक्रम मोडीत निघाला आहे. एनआयटी पटनामधील विद्यार्थ्याला मिळालेलं हे आतापर्यंतचं सर्वात मोठं पॅकेज आहे. याआधी, या कॉलेजमधून शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना सर्वाधिक पॅकेजेस ५० ते ६० लाख रुपयांपर्यंतचे पॅकेज मिळालेले आहेत. अदितीनं दिलेल्या माहितीनुसार तिला फेसबुककडून जानेवारी महिन्यातच ऑफर लेटर मिळालं होतं. मात्र त्यांनी नुकतीच कॉलेजला याबाबत माहिती दिली आहे. अदिती ही जमशेदपूरची रहिवासी आहे.
अदितीचे वडील संजय तिवारी हे टाटा स्टीलमध्ये काम करतात. आई मधु सरकारी शाळेत शिक्षिका आहे. पटना एनआयटीच्या ट्विटर पेजवरूनही अदितीचे या यशाबद्दल तिचं अभिनंदन करण्यात आलं आहे. त्याचबरोबर कुटुंबात आनंदाचं वातावरण आहे. अदितीनं फेसबुकच्या करिअर पेजला भेट देऊन अर्ज केला होता. त्यानंतर तिला ही संधी मिळाली आहे.