बेरोजगारांनो, तयारीला लागा! नव्या वर्षात कंपन्यांमधील नाेकरभरतीला येणार वेग; 'या' क्षेत्रात संधी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2021 06:21 AM2021-01-25T06:21:08+5:302021-01-25T06:21:27+5:30
आशादायी चित्र : ५३ टक्के कंपन्या कर्मचारी संख्या वाढविणार
मुंबई : काेराेना महामारीमुळे अनेकांच्या राेजगारावर संकट आले. नव्या नाेकरीच्या संधीही कमी हाेत्या. मात्र, नव्या वर्षात हे चित्र बदलताना दिसत आहे. अनेक कंपन्या २०२१ या वर्षामध्ये कर्मचारी संख्या वाढविण्याच्या विचारात आहेत.
व्यावसायिक भरती सेवा उपलब्ध करणारी कंपनी मायकल पेज इंडियाच्या ‘टॅलेंट ट्रेंड्स २०२१’ या सर्वेक्षणामध्ये ही माहिती समाेर आली आहे. सुमारे ५३ टक्के कंपन्या कर्मचारी संख्या वाढविण्याच्या तयारीत आहेत. काेराेनामुळे संपूर्ण जगभरातील अर्थव्यवस्थेवर विपरित परिणाम झाला आहे. परिणामी, राेजगाराचे माेठे संकट निर्माण झाले. नाेकरभरतीमध्ये १८ टक्क्यांहून अधिक घट झाली आहे. मात्र, नव्या वर्षात दिलासादायक चित्र अपेक्षित आहे. अर्थव्यवस्थेमध्ये हळूहळू सुधारणा हाेत आहे. त्यामुळे नाेकरभरतीला लवकरच सुरुवात हाेण्याची अपेक्षा असल्याचे या सर्वेक्षणात म्हटले आहे.
काेराेना काळात लस उत्पादक कंपन्यांनी माेठ्या प्रमाणावर नाेकरभरती केली. येणाऱ्या काळातही या क्षेत्रात मागणी राहणार असल्याचा अंदाज कंपनीने वर्तविला आहे. आराेग्य क्षेत्रातील तपासणी, औषध निर्मिती कंपन्यांमध्ये नाेकरभरतीतील वाढ कायम राहण्याची अपेक्षा आहे. आराेग्य आणि औद्याेगिक क्षेत्रात समाधानकारक नाेकरभरतीची अपेक्षा आहे. याशिवाय इंटरनेटवर आधारित व्यवसायांमध्येही मनुष्यबळाची मागणी वाढणार आहे. ई-काॅमर्स, तसेच शैक्षणिक क्षेत्रात दिलासादायक चित्र राहण्याची शक्यता आहे, असे निरीक्षण सर्वेक्षणात नाेंदविले आहे.
नव्या नाेकरीच्या संधींसाेबत वेतनामध्येही १५ ते २० टक्के वाढीची अपेक्षा आहे. त्यातही आराेग्य क्षेत्रामध्ये ही शक्यता जास्त असून, या क्षेत्रातील कंपन्या जवळपास महिनाभराचा पगार बाेनस स्वरूपात देण्याच्या तयारीत असल्याचेही सर्वेक्षणात म्हटले आहे. तंत्रज्ञान क्षेत्रातील ७४ टक्के कंपन्या मनुष्यबळ वृद्धीच्या तयारीत आहेत. यात सुमारे १४ टक्के वाढ दिसू शकते. विशेष म्हणजे, ‘वर्क फ्राॅम हाेम’ संकल्पनेतून काम करण्यासाठी तयार असलेल्यांना जास्त संधी आहेत.
या क्षेत्रातही आहेत संधी
डाटा सायंटिस्ट
अभियांत्रिकी
विक्री व व्यवसाय वृद्धी
संशाेधन आणि विकास
कायदेशीर सल्लागार
फायनान्स
वेतनवाढी (टक्क्यांमध्ये)
सरासरी ८ टक्के अपेक्षित
बँका व फायनान्स- ६.०
वाहतूक व वितरण- ६.०
एफएमसीजी- ७.६
ई-काॅमर्स/इंटरनेट सेवा- ७.५
औद्याेगिक व उत्पादन क्षेत्र- ५.९
बांधकाम- ५.३