लोकमत न्यूज नेटवर्कमूल : रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता मूल तालुक्याबरोबरच जवळपास असलेल्या सावली, सिंदेवाही व पोंभुर्णा तालुक्यातील जनतेला देखील सोयीचे व्हावे, या उद्देशाने उपजिल्हा रुग्णालय मूल येथील रुग्णालयाला श्रेणीवर्धन करून १०० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय स्थापन करण्यासंदर्भात ३१ जानेवारी २०१२ ला विशेष बाब म्हणून प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला.
तब्बल १२ वर्षांनंतर हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. मात्र, यासाठी प्रस्तावित चरखा संघाच्या जागेचा प्रश्न शासस्तरावरून सुटता सुटत नसल्याचे दिसून येत आहे. राजकीदृष्ट्या संवेदनशील समजल्या जाणाऱ्या मूल तालुक्यात रुग्णांची संख्या वाढतच आहे. आजच्या स्थितीत मूल तालुक्याची लोकसंख्या १ लाख १४ हजार ६११ आहे. मूल तालुक्यासह परिसरातील सावली, सिंदेवाही व पोंभुर्णा तालुक्यांची एकूण लोकसंख्या ४ लाख ६४ हजार ५३६ आहे.
दिवसागणिक लोकसंख्या वाढतच असून परिसरातील वाढती लोकसंख्या लक्षात घेता मूल येथील रुग्णालय पुरेसे नाही. प्रत्येकवेळी उपचारासाठी तालुक्यातील जनतेला इतर ठिकाणी जाणे म्हणजे आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. हे हेरून उपजिल्हा रुग्णालय मूल येथे असलेल्या ५० खाटांच्या रुग्णालयाचे रूपांतर १०० खाटांमध्ये करण्यात यावे, अशी मागणी जोर धरू लागल्यानंतर उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक यांनी ३१ जानेवारी २०१२ ला जिल्हा शल्यचिकित्सक चंद्रपूर यांच्या मार्फतीने मंजुरीसाठी प्रस्ताव सादर केला. जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने तब्बल १२ वर्षांनंतर १०० खाटांच्या रुग्णालयाच्या प्रस्तावाला शासस्तरावरून मंजुरी प्रदान केली.
निधीही झाला मंजूर■ रुग्णालयासाठी १०७ लाख रुपयांचा निधीदेखील मंजूर करण्यात आला. सदर रुग्णालयाचे बांधकाम जवळच असलेल्या चरखा संघाच्या जागेत केले जाणार आहे. यासाठी महसूल विभागाने जमीन हस्तांतरणाची प्रक्रिया सुरू केली आहे. मात्र, यासाठी बराच कालावधी लागत असल्याने अनेक गरीब रुग्णांना लांब अंतरावर जाऊन उपचार करावा लागत आहे यासाठी शासनाने पुढाकार घेणे गरजेचे झाले आहे.
मूल येथे १०० खाटांचे रुग्णालय मंजूर झाले असून यासाठी निधी देखील मंजूर करण्यात आला आहे. जागेसंदर्भात महसूल विभागाने मोजणी व इतर बाबींची पूर्तता करण्यासाठी प्रयत्न सुरू केला आहे. जमिनीचा प्रश्न सुटताच रुग्णालयाच्या बांधकामाला सुरुवात होईल.- डॉ. देवेंद्र लाडे, प्रभारी वैद्यकीय आधीक्षक, उपजिल्हा रुग्णालय, मूल.