१५ वर्षांपासून शशीकलाचा घरकुलासाठी संघर्ष
By admin | Published: July 30, 2016 01:36 AM2016-07-30T01:36:27+5:302016-07-30T01:36:27+5:30
बल्लारपूर पंचायत समिती अंतर्गत कोठारी ग्रामपंचायतीच्या हद्दीत असणाऱ्या शशीकला कन्हैयालाल गोस्वामी ...
अधिकाऱ्यांची उदासीनता : विधवा महिलेला सोसाव्या लागताहेत यातना
कोठारी : बल्लारपूर पंचायत समिती अंतर्गत कोठारी ग्रामपंचायतीच्या हद्दीत असणाऱ्या शशीकला कन्हैयालाल गोस्वामी ही महिला मागील पंधरा वर्षापासून घरकुलासाठी शासनाच्या दरबारी उंबरठे झिजवीत आहे. मात्र तिला अजूनही घरकुलाचा लाभ देण्यात आला नाही. घरकुलाच्या लाभासाठी तिचा संघर्ष आजही सुरुच आहे.
कोठारी येथे २००२-०३ या वर्षी दारिद्र्य रेषेखालील यादी जाहीर करण्यात आली. त्यात ४४४ नागरिकांचा समावेश करण्यात आला. या यादीत कन्हैयालाल भैरुलाल गोस्वामी यांचे नाव असून त्यांचा कुटंब ओळख क्र. ४५९३ आहे व त्यांचे १९ गुण आहेत. या यादीत चौकशी व तपासणीअंती ० ते २१ गुण असणाऱ्यांची नावे समाविष्ट आहेत. बीपीएल यादीत समाविष्ट असणाऱ्यांच्या घराची मोका चौकशी पंचायत समितीकडून करण्यात आली. त्यांच्याच अभियंत्यामार्फत कच्च्या घराची प्रतीक्षा यादी तयार करुन त्यात ८० लाभार्थ्यांना घराची आवश्यकता असल्याचा अहवाल संवर्ग विकास अधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आला. त्यातही शशिकला गोस्वामी यांचे पती कन्हैयालाल गोस्वामी यांचे नाव समाविष्ट करण्यात आले. मात्र त्यांच्याकडे घरे बांधण्यासाठी जागा उपलब्ध नसल्याचा शेरा चौकशी करणाऱ्या अभियंत्यानी मारला. परिणामी शशिकला गोस्वामी यांचे नाव घरकुल लाभार्थी मंजूर यादीत नाही. परंतु प्रत्यक्षात ग्रामपंचायतीच्या रेकॉर्डवर घराची (झोपडीची) नोंद असून त्यांच्याकडून ग्रामपंचायत प्रशासन घर आकारणी कर दरवर्षी वसूल करीत आहे. मग प्रत्यक्ष मोका चौकशी करणाऱ्या अभियंत्यांना या महिलेचे घर दिसले नाही का? याचाच अर्थ अभियंत्यांनी घरबसल्या कुणाच्या सांगण्यावरुन यादी प्रसारित करुन शशीकला गोस्वामी या विधवेस घरकुल लाभांपासून वंचित केले. असा प्रकार गावातील पाचही वॉर्डात आहे, हे विशेष.
जनता शाळेच्या मागे विधवा शशिकला कन्हैयालाय गोस्वामी ही महिला मागील २० वर्षापासून चंद्रमौेळी झोपडीत दोन मुलांना घेवून वास्तव्य करीत आहे. तिच्या झोपडीची दशा पाहून त्यात जनावरांनाही ठेवण्यालायक व्यवस्था नाही. सर्वत्र दुर्गंधी, गटराचे पाणी वाहते. मच्छरांचा प्रादुर्भाव, सरपटणाऱ्या विषारी प्राण्यांचा हैदोस अशा ठिकाणी ती दोन लहानग्या मुलांना घेवून जीवन जगत आहे. कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी धुनी, भांडी व मोलकरणीचे काम करणाऱ्या या महिलेचा संघर्ष हृदयद्रावक आहे. मात्र पाषाण हृदयी लोकप्रतिनिधींचे व कल्याणकारी अधिकाऱ्यांचे याकडे लक्ष जाऊ नये, यातच त्यांच्या कर्तव्यदक्षतेचा परिचय येतो. ग्रामपंचायतीच्या कार्यालयात घरकुलासाठी अर्ज, विनंत्या करून टाहो फोडला. मात्र तिच्या मागणीकडे कुणीही लक्ष दिले नाही. अखेर निराश होवून आपल्याच नशिबाला दोष देत तिला जीवन कंठावे लागत आहे.
जनतेच्या समस्या सोडविण्याचे आश्वासन देत प्रतिनिधीत्व करणाऱ्या लोकप्रतिनिधींनाही तिच्या संघर्षाविषयी देणेघेणे नसल्याचे दिसून येते. शासकीय योजनांचा लाभ गरजूंना मिळाला पाहिजे. जर तो शासकीय अधिकाऱ्यांकडून योग्यरित्या मिळत नसेल तर अशावेळी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेऊन अधिकाऱ्यांच्या नजरेत ती बाब आणून देणे गरजेचे आहे. मात्र संबंधित महिला आपली कुणीही नाही म्हणून त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणे, हे कितपत योग्य आहे. शशिकला गोस्वामी या महिलेने आजपर्यंत चार सरपंचांचा कार्यकाळ पाहिला. मात्र त्यातील एकालाही तिची दैनावस्था दिसली नाही. हीच त्यांची जनतेप्रति भावना व कर्तव्यदक्षता काय, असा प्रश्नही यानिमित्त उपस्थित केला जात आहे.
शशिकलांच्या घरकुलाबाबत लोकमतने ग्रामपंचायतीकडे विचारणा केली. मात्र ती चूक आमची नाही. शासकीय स्तरावरुन ती चुक झाली असल्याचे सांगण्यात आले. ग्रा.पं. सदस्य तथा बल्लारपूर तालुका युवा काँग्रेस अध्यक्ष विनोद बुटले यांनी प्रत्यक्ष पाहणी करुन शशिकला गोस्वामीला घरकुलासाठी शासनदरबारी पत्रव्यवहार करुन न्याय मिळवून देण्यासाठी पुढाकार घेतला आहे.
आतातरी शशिकलाला घरकुलाचा लाभ मिळून नरक यातना संपणार काय, हा प्रश्न अनुत्तरित आहे. (वार्ताहर)