मंगल जीवने लोकमत न्यूज नेटवर्कबल्लारपूर : वन आणि जीवन यांचे शहर आणि खेडे विभागात राहणाऱ्यांसाठी खूप निकटचे नाते आहे. वनांमुळे आपण आहोत, हे सर्वविदित आहे. पण काही वेळा वन्यप्राण्यांकडून नागरिकांवर हल्ले होतात. हे लक्षात घेऊन राज्य शासनाने वनाशेजारच्या वस्त्यांमधील नागरिकांवर हल्ला झाल्यास, वन्य प्राण्यांनी शेत पिकांचे नुकसान केल्यास, पशुधन हानी झाल्यास शासन त्यांच्या मदतीस धावून जाते व त्यांना नुकसान भरपाई देते. बल्लारपूर वनविभागाने सहा वर्षात २ हजार २३ जणांना १८ कोटी ६१ लाख ९ हजार ११४ रुपयांचे अर्थसहाय्य केले आहेबल्लारपूर तालुक्यात सात हजारपेक्षा अधिक शेतकरी आहेत. विसापूर, बामणी, इटोली, मानोरा,पळसगाव, कोठारी, दहेली, कारवा या क्षेत्रात वन्य प्राण्यांचा वावर असल्यामुळे अतिशय संवेदनशील क्षेत्र मानले जाते. शहरी भागात बल्लारपूरचाही समावेश होतो. मागील सहा वर्षात बल्लारपूर वनपरिक्षेत्र कार्यालयाने बल्लारपूर तालुक्यातील शेतपिकांचे नुकसान, पशुधन हानी व मनुष्य हानी प्रकरणी १८ कोटी ६१ लाख ९ हजार ११४ रुपयांचे अर्थसहाय्य केले आहे. बल्लारपूर तालुक्यात आठ महिन्यात शेतपीक, पशुधन हानी व मनुष्य हानी झालेल्या ६२ जणांना एक कोटी २९ लाख ४ हजार जणांना अर्थसहाय्य देण्यात आले.बल्लारपूर तालुक्यात मागील सहा वर्षात शेतपिकांचे नुकसान झालेल्या १ हजार ३९२ शेतकऱ्यांचे अर्ज वन खात्यास प्राप्त झाले, तर पशुधन हानी प्रकरणी ५८३ नागरिकांचे अर्ज मिळाले आणि मनुष्य हानी प्रकरणी ४८ खेडेगावातील नागरिकांचे निवेदन प्राप्त झाले. त्यानुसार तातडीने हे अर्ज शासनाकडे पाठविण्यात आले व मंजूर करण्यात आले, असे वन परिक्षेत्र अधिकारी संतोष थिपे यांनी सांगितले.
तालुक्यातील वनव्याप्त भागातील शेतकऱ्यांना दरवर्षी वन्यप्राण्यांच्या हैदोसाचा सामना करावा लागतो. वन्यप्राण्यांकडून पिकांचे नुकसान होतेच, शिवाय अनेक शेतकरी हल्ल्यामध्ये जखमीही होत असल्याच्या घटना बल्लारपूर तालुक्यात घडल्या आहेत. यावर वन खात्याने त्वरित लक्ष दिल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे. - सुमित डोहणे,सामाजिक कार्यकर्ता, बल्लारपूर
घटनेची माहिती मिळताच त्या परिसरात वन खात्याचे अधिकारी पोहोचून त्यांना तत्काळ मदत करतात. मानोरा येथील मनुष्य हानीची वन खात्याने दखल घेऊन तत्काळ मदत केली. याशिवाय वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या व्यक्तींना औषधोपचारासाठी २० हजार रुपयांचे अर्थसहाय्य तत्काळ केले जाते. -संतोष थिपे,वनपरिक्षेत्र अधिकारी, बल्लारपूर.