चंद्रपूर : मागील हंगामात सहा हजार ४४२ शेतकऱ्यांनी पिकाचा विमा काढला होता. त्यातील दोन हजार १८१ शेतकऱ्यांना पिकाचे नुकसान होऊनही अद्याप पीक विमा कंपनीकडून नुकसानभरपाई मिळाली नाही. येत्या काही दिवसांत शेतीचा नवीन हंगाम सुरू होणार आहे. त्यामुळे मागील हंगामातील पीक विम्याचे पैसे मिळावे याकरिता शेतकरी कृषी कार्यालयात चकरा मारत असल्याचे दिसून येत आहे.
६५ मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस झाला असेल, अशावेळी पीक विमा काढला असल्यास त्याची नुकसानभरपाई शेतकऱ्यांना कंपनीच्या वतीने दिली जाते. पिकाची कापणी केल्यानंतर पाऊस येऊन नुकसान झाल्यास व पीकविमा काढला असल्यास पीकविमा कंपनी नुकसानभरपाई देत असते. नुकसान झाल्यापासून ४८ तासांच्या आत शेतकऱ्याने विमा कंपनीकडे तक्रार करणे गरजेचे आहे. त्यानंतर विमा कंपनी प्रतिनिधी व कृषी सहायक संयुक्त सर्व्हे करून नुकसानीचा अहवाल विमा कंपनीकडे पाठवीत असतात.
विमा काढणारे अन् भरपाई मिळणारे शेतकरी
मागील हंगामात सोयाबीन पिकाचा चार हजार २५८ शेतकऱ्यांनी विमा काढला. त्यात दोन हजार ६४४ शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळाली. कापूस पिकाचा विमा एक हजार ४८६ शेतकऱ्यांनी काढला. त्यातील एक हजार ३३४ शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळाली. तूर पिकाचा विमा ४८३ शेतकऱ्यांनी काढला. त्यात २८३ शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळाली. भात पिकाचा विमा २०९ शेतकऱ्यांनी काढला. ज्वारी पिकाचा विमा सहा शेतकऱ्यांनी काढला. नवीन हंगामाला येत्या काही दिवसांत सुरुवात होणार आहे. मात्र, दोन हजार १८१ शेतकऱ्यांना मागील वर्षातील पीक विमा अद्याप मिळाला नाही. त्यामुळे संताप व्यक्त केला आहे.
पीक नुकसानीचा अहवाल पाठविण्यात आला आहे. उर्वरित शेतकऱ्यांना विमा कंपनीकडून नुकसानभरपाई देण्याची प्रक्रिया सुरू आहे.-गजानन भोयर तालुका कृषी अधिकारी, वरोरा