चंद्रपूर : वनाचे व्यवस्थापन व संवर्धनाची जबाबदारी पेलून वनहक्क कायद्याचा वापर करून ब्रह्मपुरी, सिंदेवाही व नागभीड तालुक्यातील तब्बल २५ गावांनी यंदाच्या तेंदूपत्ता तोडाईचा करार नुकताच पूर्ण केला आहे. यंदा चार हजार पोती तेंदूपत्ता संकलनाचे उद्दिष्ट पूढे ठेवले. यापूर्वी वनहक्क कायद्यापासून अनभिज्ञ असणाऱ्या या गावांच्या जंगलात वन विभागाने आपली मालकी प्रस्थापित केली होती. वनहक्क कायद्यामुळे हा बदल घडून आला आहे.
अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वन निवासी (वन हक्काची मान्यता) अधिनियम २००६ व नियम २००८ आणि सुधारित नियम,२०१२ नुसार अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वन निवासी यांना कलम ३ (१) नुसार वैयक्तिक व सामुहिक वनहक्क किंवा दोहोंचे धारणाधिकार मिळण्याचे अधिकार प्राप्त झाले आहेत. स्वत:च्या उपजीविकेकरीता शेती कसण्यास वन जमिनी धारण करण्याचा व त्यामध्ये राहण्याचा हक्क, निस्तारसारखे हक्क, गौण वनोत्पादन गोळा व त्याचा वापर करणे किंवा विल्हेवाट लावणे यासाठी स्वामित्व हक्क, मत्स्य व अन्य उत्पादन, चराई करणे, सामाजिक वनस्त्रोताचे संरक्षण, पुनर्निमाण, संवर्धन, व्यवस्थापन करण्याचे हक्क प्राप्त झाले. मात्र, या कायद्याच्या जागृतीअभावी बरेच वर्षे जंगलाची मालकी वन विभागाकडे होती. ब्रह्मपुरी, सिंदेवाही व नागभीड तालुक्यातील बिगरपेसा २५ गावांनी या कायद्याचा वापर करून तेंदूपत्ता संकलनाचे अधिकार प्राप्त केले आहेत.
यंदा तेंदूपत्ता तोडाईला विलंब
यंदा अवकाळी पावसाने निसर्गाचे चक्र बदलले. त्यामुळे प्रत्यक्षात तेंदूपत्ता तोडाई व संकलनास विलंब होणार आहे. सध्या तेंदूच्या झाडांना पालवी फुटू लागली. हवामान पूरक राहिल्यास पुढील महिन्यापासून तेंदूपत्ता हंगाम सुरू होऊ शकतो.
तेंदूपत्याचे दर घसरले
जिल्ह्यात वेगवेगळ्या गावांत तेंदूपत्ता दरात परक आहे. करार केलेल्या २५ गावांना यंदा प्रति १०० पुडके ३८० रूपये दर मिळाला आहे. गतवर्षी हा दर ४१० रूपये होता. गतवर्षीच्या तुलनेत दर कमी मिळाल्याने गावांच्या महसूलातही थोडी घट होऊ शकते.