नागभीड (चंद्रपूर) : नागपूरवरून ब्रह्मपुरी तालुक्यातील किन्ही येथे जात असलेल्या कारला ट्रॅव्हल्सची जोरदार धडक बसली. यात कारमधील पाच जण जागीच ठार झालेत तर ९ वर्षाच्या चिमुकलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना रविवारी दुपारी ३:१५ च्या सुमारास घडली.
मृतांमध्ये दोन पुरुष व चार महिलांचा समावेश आहे. सर्व मृत नागपूरचे रहिवासी आहेत. रोहन विजय राऊत (३०), ऋषिकेश विजय राऊत (२८), गीता विजय राऊत (५२), रा. चंदननगर नागपूर, सुनीता रूपेश फेंडर (४०), प्रभा शेखर सोनवाने (३५), रा.नागपूर, यामिनी रूपेश फेंडर (९) अशी मृतांची नावे आहेत. मृत एकाच परिवारातील आहेत. अपघातात ९ वर्षांची यामिनी गंभीर जखमी झाली. तिला उपचारासाठी नागपुरात हलविण्यात आले. मात्र उपचारादरम्यान तिचाही मृत्यू झाला.
रोहन यांची पत्नी व मुलगा ब्रह्मपुरी तालुक्यातील किन्ही येथे एक वर्षापासून राहत आहे. पत्नी पतीपासून विभक्त राहत असल्याची माहिती आहे. मुलाची शाळेची फी भरायची असल्याने संपूर्ण परिवार फीचे पैसे देण्याच्या आणि मुलाला भेटण्याच्या उद्देशाने एमएच ४९ - बीआर २२४२ या क्रमांकाच्या अल्टो कारने नागपूरवरून ब्रह्मपुरी तालुक्यातील किन्ही येथे जात होते, तर एआरबी कंपनीची (एमएच ३३ टी २६७७) ही ट्रॅव्हल्स नागभीडवरून नागपूरला जात होती. ट्रॅव्हल्सने कान्पा गावाजवळ कारला धडक दिली. या धडकेत कारच्या समोरील भागाचा पूर्ण चेंदामेंदा झाला. मागच्या सीटवर बसलेली एक महिला धक्क्याने एकदम समोर उसळली, यावरून धडकेची भीषणता लक्षात येते.
मुलाची भेटही होऊ शकली नाही
रोहन राऊत मुलाच्या भेटीसाठी कुटुंबीयांसमवेत निघाले होते; पण नियतीच्या मनात वेगळेच काही असावे. क्रूर नियतीने मुलाच्या भेटीअगोदरच राऊत कुटुंबीयांवर घाला घातला.
ठाणेदाराची तत्परता
घटनेची माहिती मिळताच ठाणेदार योगेश घारे तातडीने ताफ्यासह घटनस्थळी पोहोचले. प्रथम त्यांनी आजूबाजूला जमलेली गर्दी बाजूला केली. लगेच जखमी मुलीस तातडीने बाहेर काढले आणि दोन पोलिस सोबत देऊन एका रुग्णवाहिकेद्वारे नागपूरला हलविले.
सब्बलने काढावे लागले मृतदेह
धडकेत कारचा पूर्ण चेंदामेंदा झाल्याने कारमधील मृतदेह काढण्यास अडचण येत होती. म्हणून सब्बलने दरवाजे तोडून मृतदेह बाहेर काढावे लागले. गेल्या काही वर्षांतील नागभीड तालुक्यात पहिल्यांदाच एवढा मोठा अपघात घडल्याची माहिती आहे.