९५० लोकसंख्या असलेल्या गावात सुरू झाले पोस्ट कार्यालय, नागरिकांची दहा किमीची पायपीट थांबणार
By साईनाथ कुचनकार | Published: October 20, 2023 06:15 PM2023-10-20T18:15:14+5:302023-10-20T18:16:12+5:30
ग्रामस्थांना मिळणार सुविधा : पारोधा गावातील नागरिकांनी व्यक्त केला आनंद
चंद्रपूर : सध्या स्पर्धेचे युग आहे. त्यातच ऑनलाईन व्यवहारही मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. मात्र, एखाद्या लहानशा गावातील नागरिकांना त्रास होऊ नये यासाठी पोस्ट विभागाने दखल घेतली आहे. गावातील नागरिकांचे आर्थिक व्यवहार सोबतच पत्रव्यवहारही सुलभ व्हावा या उद्देशाने भद्रावती तालुक्यातील पारोधा या अवघ्या ९५० लोकसंख्या असलेल्या गावामध्ये पोस्ट कार्यालय सुरू करण्यात आले आहे. या कार्यालयामुळे आता गावातील नागरिकांची दहा किमीची पायपीट पूर्णपणे थांबणार आहे.
या कार्यालयाचे उद्घाटन करण्यासाठी महाराष्ट्र सर्कलचे मुख्य पोस्टमास्टर जनरल किशन कुमार शर्मा, नागपूर क्षेत्रीय कार्यालयाच्या पोस्टमास्टर शोभा मधाळे, चंद्रपूर डाक विभागाचे अधीक्षक मोहन निकम यांच्यासह शाखा डाकपाल, पारोधी येथील शासकीय कर्मचारी तथा ग्रामस्थांची मोठी उपस्थिती होती.
पारोधा या गावातील नागरिकांनी पूर्वी १० कि.मी. अंतरावर असलेल्या आष्टा येथे पत्रव्यवहार, तसेच पोस्टातील विविध योजनांसह आर्थिक व्यवहार करण्यासाठी जावे लागत होते. मात्र, भारतीय डाक विभागाने नुकतेच या गावात पोस्ट कार्यालय मंजूर केले आणि या गावातील नागरिकांची पोस्ट कार्यालयाची पायपीट पूर्णपणे थांबविली. विशेष म्हणजे, या कार्यालयासाठी शाखा डाकपाक, सहायक शाखा डाकपाल ही पदेही मंजूर झाली आहेत. त्यामुळे येथील नागरिकांना पोस्टाचे व्यवहार करणे अधिकच सुलभ झाले आहे.
पोस्टाच्या योजनांचा लाभ घ्या - किशन कुमार शर्मा
डाक विभागाच्या विविध योजना आहेत. सुकन्या समृद्धी योजना, सन्मान बचत पत्र योजना, बचत खाते, पीपीएफ, इंडिया पोस्ट पेमेंट बँकद्वारे देण्यात येणाऱ्या विविध सेवांचा लाभ घेण्याचे आवाहन या कार्यालयाच्या उद्घाटनासाठी आलेले महाराष्ट्र सर्कलचे मुख्य पोस्टमास्टर जनरल किशन कुमार शर्मा यांनी केले. याचवेळी नागपूर क्षेत्रीय कार्यालयाच्या पोस्टमास्टर शोभा मधाळे यांनी कॉमन सर्व्हिस सेंटरद्वारे ७२ प्रकारच्या विविध सेवा यामध्ये पॅन काढणे, वीज बिल भरणा सुविधा असल्याचे सांगून महिला सन्मान बचत पत्र योजना, सुकन्या समृद्धी योजना या योजनांबाबत माहिती दिली. तसेच अधिकाधिक महिलांनी लाभ घ्यावा, असे आवाहन केले.