चंद्रपूर : महिलांवर जादूटोणा करीत असल्याचा आरोप करून एका युवकाला चक्क ट्रॅक्टरला बांधून बेदम मारहाण केल्याची खळबळजनक घटना ब्रह्मपुरी तालुक्यातील बेलगाव येथे शनिवारी (दि. १) रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली. दरम्यान, मारहाणीची चित्रफीत समाजमाध्यमांवर व्हायरल केल्याने पोलिसांना माहिती मिळाली. तक्रारीनंतर दोन दिवसांनी सोमवारी (दि. ३) तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला.
राहुल जगदाळे (रा. श्रीरंगवाडी, जि. बीड) असे पीडित युवकाचे, तर दिनेश काशीनाथ अवसरे, नीलेश काशीनाथ अवसरे, गणेश काशीनाथ अवसरे अशी आरोपींची नावे आहेत. ब्रम्हपुरी तालुक्यातील बेलगाव येथे पीडित युवक राहुल जगदाळे हा भगवान महादेव जगताप यांच्या हाताखाली पाणीपुरवठा योजनेवर देखरेखीचे काम करीत होता. शनिवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास आरोपी दिनेश काशीनाथ अवसरे, नीलेश काशीनाथ अवसरे व गणेश काशीनाथ अवसरे या तीन भावंडांनी राहुल जगदाळे हा महिलांना जादूटोणा करून आपल्या जाळ्यात ओढतो, या संशयावरून ट्रॅक्टरला बांधून व हातात कोयता घेऊन बेदम मारहाण केली. धक्कादायक म्हणजे, मारहाणीचे चित्रीकरण करून समाजमाध्यमांवर व्हायल केले. पोलिसांनी ही चित्रफीत पाहिल्यानंतर पथक गावात आले. पण, दोन्ही बाजूंनी तक्रार दाखल न झाल्याने पोलिसांनी त्या दिवशी गुन्हा दाखल केला नाही. या चित्रफितीची माहिती वरिष्ठांपर्यंत पोहोचताच पाणीपुरवठा योजनेचे भगवान जगताप यांनी तक्रार केल्याने सोमवारी पोलिसांनी आरोपी दिनेश काशीनाथ अवसरे, नीलेश काशीनाथ अवसरे, गणेश काशीनाथ अवसरे या तिघांविरुद्ध भादंवि २९४, ३४१, ३५२, ३२३, ५०६, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला.
मारहाणीनंतर युवकाने सोडले गाव
आरोपींनी जादूटोण्याच्या संशयावरून बेदम मारहाण केल्यानंतर पीडित युवक राहुल जगदाळे याला जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्यामुळे हा युवक घाबरून तक्रार न करता बीड जिल्ह्यातील श्रीरंगवाडी या आपल्या मूळ गावी निघून गेला. मारहाणीची चित्रफीत व्हायरल झाली नसता तर ही घटना उघडकीसच आली नसती, अशी नागरिकांत चर्चा आहे.
माहिती देण्यास पोलिसांचा नकार
मारहाणीच्या घटनेबाबत कोणतीही माहिती देण्यास पोलिस अधीक्षकांनी मनाई केली. अशा प्रकरणात सात वर्षांच्या आत शिक्षा होत असल्याने आरोपींना नोटीस देऊन सोडण्यात आले. पुढील कारवाई न्यायालयात होईल, असे सांगून अधिक माहिती देण्यास ब्रह्मपुरीचे ठाणेदार सुधाकर आंभोरे यांनी नकार दिला.