बालकांच्या आधारसाठी प्रशासन गंभीर
By admin | Published: April 14, 2015 01:06 AM2015-04-14T01:06:09+5:302015-04-14T01:06:09+5:30
जिल्हाभरातील नागरिकांच्या आधार नोंदणीचे उद्दिष्ट गाठत असलेल्या प्रशासनाने आता बालकांच्या आधार नोंदणीसाठी कंबर
५६३५० हजारांवर नोंदणी : अंगणवाडी केंद्रांमध्ये शिबिराचा धडाका
रवी जवळे ल्ल चंद्रपूर
जिल्हाभरातील नागरिकांच्या आधार नोंदणीचे उद्दिष्ट गाठत असलेल्या प्रशासनाने आता बालकांच्या आधार नोंदणीसाठी कंबर कसली आहे. यासाठी अंगणवाडी केंद्रांना अलर्ट केले असून त्यासाठी विशेष शिबिराचा धडाकाही सुरू केला आहे. आतापर्यंत जिल्ह्यात अंगणवाडी बालकांसाठी ६० आधार नोंदणी शिबिर आयोजित केले असून पुन्हा एवढेच शिबिर या वर्षात आयोजित करण्याची योजना प्रशासनाने आखली आहे.
प्रत्येक भारतीयाची ओळख म्हणून शासनाने आधार कॉर्डाला विशेष महत्त्व दिले आहे. कोणत्याही गोष्टीसाठी वा योजनेच्या लाभासाठी आधार कॉर्ड जोडणे शासनाने बंधनकारक केले आहे. मात्र एवढी मोठी लोकसंख्या असलेल्या देशात प्रत्येकाची आधार नोंदणी करणे अवघड काम होते. मात्र प्रशासकीय यंत्रणेने हे काम बऱ्यापैकी यशस्वी केले आहे. निदान चंद्रपूर जिल्ह्यात तरी याचा प्रत्यत येत आहे.
प्रशासनाकडील आकडेवारीनुसार चंद्रपूर जिल्ह्यातील लोकसंख्या २१ लाख ९४ हजार २६२ आहे. आतापर्यंत यातील तब्बल १८ लाख ४६ हजार ४६८ नागरिकांना आधार कॉर्डचे वितरण झालेले आहे. याची टक्केवारी ८४.१५ आहे. आता जिल्ह्यात केवळ ३ लाख ४७ हजार ७९४ नागरिकांची आधार नोंदणी शिल्लक आहे. यात वरोरा आणि ब्रह्मपुरी तालुक्यातील सर्वाधिक नागरिक आधार कॉर्डपासून वंचित आहेत. हे उद्दिष्टही लवकरात लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न प्रशासनाने सुरू ठेवला आहे.
विशेष म्हणजे, विविध योजनांच्या लाभासाठी आधार कॉर्ड बंधनकारक केले असल्यामुळे नागरिकांनी आधार केंद्रांकडे धाव घेत आपापले आधार कॉर्ड काढून घेतले. मात्र मुलाबाळांच्या आधार नोंदणीकडे बऱ्याच नागरिकांनी गांभीर्याने बघितले नाही.
त्यामुळे बहुतांश लहान मुलांची आधार नोंदणी झालेली नाही. लहान मुले आधार कॉर्डपासून वंचित राहिले तर आधार नोंदणीचे उद्दिष्ट कधीच पूर्ण होणार नाही,
ही बाब प्रशासनाच्या लक्षात येताच त्यांनी लहान मुलांच्या आधार नोंदणीकडे गांभीर्याने लक्ष देणे सुरू केले आहे. या संदर्भातील काही सूचना संबंधित अधिकारी व अंगणवाडी सेविकांनाही देण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे, यासाठी प्रशासनाने आधार नोंदणी शिबिराचा धडाकाच सुरू केला आहे.
जिल्ह्यात एकूण २ हजार ६८५ अंगणवाडी केंद्र आहेत. यातून १ लाख ४३ हजार ४४३ बालके शिक्षण घेत आहेत. प्रशासकीय यंत्रणेने या अंगणवाडी केंद्रात आतापर्यंत ६० आधार नोंदणी शिबिर आयोजित केले आहेत. यातून ५६ हजार ३५० बालकांना आधार कॉर्ड उपलब्ध करून दिले आहे. आणखी ८७ हजार ९३ बालकांना अद्याप आधार कॉर्ड मिळालेले नाही. त्यामुळे पुढे आणखी ६० शिबिरे आयोजित करण्याचे प्रशासनाने ठरविले आहे.
शासनाच्या निर्देशानुसार अंगणवाडीमधील बालकांचे आधार कॉर्ड काढणे सुरू आहे. मागील दोन महिन्यांपासून ही मोहीम हाती घेतली असून अर्धे उद्दिष्ट साध्य केले आहे. जूनअखेरपर्यंत अंगणवाडीतील सर्व बालकांना आधार कॉर्ड मिळाले असतील, या दिशेने प्रयत्न सुरू आहे.
- अनिल डोंगरदिवे, जिल्हा प्रकल्प व्यवस्थापक (आधार), चंद्रपूर.
खासगी शाळांमधील बालकांचे काय ?
प्रशासन अंगणवाडी केंद्रांमधील बालकांसाठी आधार नोंदणी शिबिर आयोजित करीत आहेत. मात्र सध्या जिल्हाभरात ठिकठिकाणी खासगी कान्व्हेंट उघडण्यात आले आहेत. यातूनही हजारो बालके शिक्षण घेत आहे. यातील बहुतांश बालकांकडे आधार कॉर्ड नाही. त्यांच्यासाठी प्रशासनाने असेच शिबिरे आयोजित करावीत, अशी मागणी आहे.