वरोरा : पेट्रोल व डीझेलच्या किमंतीत सातत्याने वाढ होत आहे. केंद्र सरकारचे धोरण याला जबाबदार असल्याचा आरोप करून धोरणाचा विरोध करीत राष्ट्रवादी पदवीधर संघाच्या वतीने शहरातील पेट्रोल पंपासमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी केंद्र सरकारच्या धोरणाविरोधात घोषणा देण्यात आल्या.
देशात कोरोना प्रादुर्भावाच्या काळात रोजगारावर मंदीचे सावट आले आहे. व्यापारी व सर्वसामान्यांच्या मिळकतीत घट झाली आहे. आर्थिक अडचणीचा हा काळ आहे. अशातच केंद्र सरकार पेट्रोल, डीझेल व इंधनाच्या भावात कमालीची वाढ करुन जनतेची प्रत्यक्ष लूट करीत आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात पेट्रोल, डिझेलचे भाव कमी होत असताना आपल्या देशात मात्र भाववाढच होत आहे. केंद्र सरकार पेट्रोल, डिझेलवरील कर कमी करुन भाव नियंत्रणात ठेवू शकते व जनतेची अडचण दुर करु शकते.
केंद्र सरकारने या आंदोलनाची दखल घ्यावी व जनतेला महागाईतून वाचवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
यावेळी ॲड. मोरेश्वर टेमुर्डे, विशाल पारखी, पारशिवे, जयंत टेमुर्डे, वानखेडे, मजुमिल शेख, बंडू भोंगळे, विधाते, प्रा. अशोक पोफळे आदी उपस्थित होते.