माजी विद्यार्थ्यांनी जोपासली सामाजिक बांधिलकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:31 AM2021-05-25T04:31:34+5:302021-05-25T04:31:34+5:30
फोटो नागभीड : कोरोनाच्या संक्रमणाने संपूर्ण जग झपाटून गेले आहे. अशा परिस्थितीत सुविधांची कमतरता पडत आहे. यामुळे रुग्णच नाही ...
फोटो
नागभीड : कोरोनाच्या संक्रमणाने संपूर्ण जग झपाटून गेले आहे. अशा परिस्थितीत सुविधांची कमतरता पडत आहे. यामुळे रुग्णच नाही तर वैद्यकीय सुविधा देणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना सुद्धा त्रास सहन करावा लागतो आहे. हा त्रास होऊ नये व सामाजिक बांधिलकीतून आपलाही हातभार लागावा या हेतूने येथील जनता विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांनी एक ग्रुप स्थापन करून निधी गोळा केला आणि या निधीतून कोविड केअर सेंटरला वैद्यकीय उपयोगाच्या विविध वस्तू भेट दिल्या.
कोरोनाचा वाढता प्रकोप लक्षात घेता येथील कोविड केअर सेंटरवर विविध सुविधांची चणचण भासत होती. ही बाब येथील नगरसेवक दिनेश गावंडे यांच्या निदर्शनास आली. त्यांनी आपले सहकारी डॉ. समीर जोशी यांना याबाबत अवगत केले. गावंडे यांनी मांडलेली संकल्पना जोशी यांनाही पटली. त्यांनी लगेच येथील जनता विद्यालयात शिकून गेलेल्या विद्यार्थ्यांचा जे. व्ही. एन. नावाचा ग्रुप तयार केला व सोशल मीडियाच्या माध्यमातून जनता विद्यालय नागभीडच्या माजी विद्यार्थ्यांना निधीसाठी आवाहन केले. या आवाहनाला जनता विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांनी भरघोस प्रतिसाद दिला.
प्राप्त झालेल्या निधीतून चार थर्मल गन, दहा पल्स ऑक्सिमीटर, दहा ऑक्सिजन फ्लोमीटर,१४० नसल कॅनेल, १०० ऑक्सिजन मास्क, दहा नेबुलायझर, ५० मँट्रेस, १०० बेडशिट्स, ५० उशा, एक हॉट ॲण्ड कोल्ड वॉटर डिस्पेन्सर, ५० फेसशिल्ड, ५०० ग्लोव्हज यासह आवश्यक असलेल्या गोळ्यांची पाकिटे खरेदी करून ते येथील कोविड केअर सेंटरकडे सुपूर्द करण्यात आली. या उपक्रमाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. गावंडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विनोद मडावी यांनी कौतुक करून आभार व्यक्त केले. यावेळी नगरसेवक दिनेश गावंडे, राहुल धकाते, कुणाल सिंगम, सुमित राजूरकर, श्रेयस वाघमारे, संकल्प खरात, तुषार निनावे, पराग भानारकर, प्रणय रंधये, स्वप्नील संदोकर, नीलेश कोसे हे जनता विद्यालयाचे माजी विद्यार्थी उपस्थित होते.