चंद्रपूर : सिपेट हे चंद्रपूर जिल्ह्यातील युवकांना प्रशिक्षण व रोजगार देण्याच्या दृष्टीने एक महत्वाकांक्षी पाऊल असून निर्माणाधीन इमारतीत कौशल्य प्राप्तीसाठी प्रशिक्षणार्थींना प्रत्येक तांत्रिक व इतर महत्वपूर्ण सोयी सुविधा युक्त इमारत असल्याचे समाधान पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी ताडाळी येथील सिपेटच्या निर्माणाधीन इमारतीची पाहणी करताना व्यक्त केले.
यावेळी सिपेट चंद्रपूरचे सहसंचालक व प्रमुख मिलिंद भरणे, भाजप किसान आघाडी जिल्हाध्यक्ष राजू घरोटे, मोहन चौधरी, पडोली ग्राम पंचायत सदस्य विक्की लाडसे, मुकेश यादव, राहुल बोरकर, तुषार मोहुर्ले आदी उपस्थित होते. केंद्रीय रसायन व उर्वरक राज्यमंत्री पदाची कमान खांद्यावर असताना चंद्रपूर व इतर नजीकच्या जिल्ह्यातील युवकांना प्लास्टिक अभियांत्रिकी व तांत्रिक प्रशिक्षण मिळावे व त्यातून विस्तृत रोजगार तसेच स्वयंरोजगार निर्माण व्हावा, अशी संकल्पना समोर मांडून सिपेट हा अभिनव प्रकल्प चंद्रपूर जिल्ह्यात मंजूर केला होता असे यावेळी अहीर यांनी सांगितले. सिपेटच्या माध्यमातून २४०० प्रशिक्षणार्थीना प्लास्टिक तंत्रज्ञान डिप्लोमा पद्धतीचे धडे मिळणार असून यातून अभिनव तंत्रज्ञान व रोजगारनिर्मिती होईल असा विश्वास यावेळी हंसराज अहीर यांनी व्यक्त केला. आजपावेतो सिपेट च्या माध्यमातून जवळपास २००० प्रशिक्षणार्थींना ३ - ६ महिन्यांचे प्रशिक्षण देण्यात आले असून जवळपास १८०० प्रशिक्षणार्थींना रोजगार मिळाल्याचा समाधान यावेळी अहीर यांनी व्यक्त केला. सिपेटची निर्माणाधीन इमारतीत सर्व सुविधा, प्रशिक्षण, नाविन्यपूर्ण तांत्रिक उपकरणे, निवास, भोजन व्यवस्था अशा सुविधांनी पूरक असल्याने विद्यार्थ्यांना विद्यार्जन करताना त्यांच्या विद्यार्थी जीवनातील एक सुखद अनुभव मिळेल असेही यावेळी अहीर यांनी सांगितले.