प्रशासकांनी घेतलेली मानधनाची रक्कम वसूल करावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:51 AM2021-02-06T04:51:04+5:302021-02-06T04:51:04+5:30
सावली : मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीत पंचायत समितीचे अधिकारी हे प्रशासकाचे कामकाज पाहात असून, ग्रामपंचायत फंडातून नियमबाह्यरित्या घेतलेले मानधन वसूल ...
सावली :
मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीत पंचायत समितीचे अधिकारी हे प्रशासकाचे कामकाज पाहात असून, ग्रामपंचायत फंडातून नियमबाह्यरित्या घेतलेले मानधन वसूल करावे, असे आदेश पंचायत समिती सभापती विजय कोरेवार यांनी संवर्ग विकास अधिकारी यांना दिले आहेत.
सावली तालुक्यातील ५० ग्रामपंचायतींची मुदत सप्टेंबर महिन्यात संपली. मात्र, कोरोनामुळे निवडणूक झाली नसल्याने शासनाने पंचायत समितीतील विस्तार अधिकारी व इतर अधिकारी यांची प्रशासकपदी नेमणूक केली. कोविडमुळे ग्रामपंचायत फंडात निधी नसल्याने गावातील अनेक कामे रखडली आहेत. मात्र, प्रशासकांनी आपल्या अधिकाराचा दुरूपयोग करीत ग्रामपंचायत फंडातून मानधन काढण्याचे कोणतेही आदेश नसताना नियमबाह्यरित्या मानधन काढले आहे. एका ग्रामपंचायतीचे मासिक मानधन कमीत कमी तीन हजार रुपये असून, एका अधिकाऱ्यांकडे ५-६ ग्रामपंचायतींच्या प्रशासकाची जबाबदारी असल्याने सर्व ग्रामपंचायतींमधून मानधन घेतलेले आहे. ही बाब सभापती विजय कोरेवार यांच्या लक्षात आली असता नाराजी व्यक्त करीत प्रशासकांनी नियमबाह्यरित्या काढलेले मानधन वसूल करून ग्रामपंचायत फंडात जमा करावे व कसूर केल्यास कारवाई करावी, असे आदेश पंचायत समितीचे संवर्ग विकास अधिकारी यांना दिले आहेत.