लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक जयवंत चव्हाण यांनी दाखविलेल्या माणुसकीने एका वृद्धाला अनेक वर्षांनी त्याचे कुटुंबीय मिळवून दिले. त्या वृद्धाला ऐकू येत नसल्याची बाब लक्षात येताच श्री संत गजानन महाराज गौरव गाथा समितीचे अध्यक्ष जयंत मामीडवार यांच्या पुढाकारात कर्णयंत्र मिळाल्याने तो वृद्ध ऐकूही लागला. माणुसकीचा संगम यानिमित्ताचे चंद्रपूरकरांना अनुभवाला आला.एक वृद्ध ज्याचे केस व दाढी वाढलेले. तो भिक्षेकरी वाटावा असा पेहराव असलेला वृद्ध थंडीने कुडकुडत होता. आपल्या कार्यालय परिसराची स्वच्छता करीत असताना वाहतुक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक जयवंत चव्हाण यांचे त्याच्यावर लक्ष गेले अन् त्यांच्यातील माणुसकी जागी झाली. त्यांनी त्या वृद्धाला स्नान करून दाढी व केस कापून मूळ रुपात आणले असता ती व्यक्ती ओळखीची निघाली. त्या वृद्धाची त्याच्या कुटुंबीयांशी भेट घालून दिली. कित्येक वर्षांपासून बेपत्ता असलेला आधारस्तंभ मिळताच त्याच्या कुटुंबीयांच्या आनंदाला पारावार उरला नाही. रक्ताच्या नात्याची गाठभेट घालून दिल्याबद्दल पोलीस निरीक्षक जयवंत चव्हाण कौतुकास पात्र ठरले.त्या वृद्धाला ऐकू येत नव्हते. हे ऐकून माणुसकीचा दुसरा हात मदतीसाठी पुढे आला तो श्री संत गजानन गौरव गाथा समितीच्या रुपाने. श्री संत गजानन गौरव गाथा समितीचे अध्यक्ष जयंत मामीडवार यांनी त्याला कर्णयंत्र भेट देण्याची तयारी दर्शवून थेट येथील नाक, कान, घसा तज्ज्ञ डॉ. मंगेश गुलवाडे यांचे रुग्णालय गाठले. तपासणीअंती कर्णयंत्र उपलब्ध करून दिले.या भावनिक प्रसंगाचे पोलीस निरीक्षक जयवंत चव्हाण, समितीचे राजेंद्र तुम्मेवार, विलास कोहळे, किशोर बोधे, विजयराव देशमुख, बंडूभाऊ पोटे, संदीप देशपांडे, अतुल सगदेव, समिर तातावार, क्रिष्णकांत पोद्दार, धिरज चौधरी, महेश पिंपळखुटे यांच्यासह शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार एस. एस. भगत, ठाणेदार अशोक कोळी, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे ही मंडळी साक्षीदार ठरली. हे निमित्त साधून समितीच्यावतीने पोलीस निरीक्षक जयवंत चव्हाण यांचा सत्कारही करण्यात आला. तत्पूर्वी पुलवामा येथे शहीद झालेल्या ४४ भारतीय सैनिकांना श्रद्धाजंली अर्पण करण्यात आली.
अन् तेथे बघायला मिळाला माणुसकीचा संगम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2019 12:25 AM
वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक जयवंत चव्हाण यांनी दाखविलेल्या माणुसकीने एका वृद्धाला अनेक वर्षांनी त्याचे कुटुंबीय मिळवून दिले. त्या वृद्धाला ऐकू येत नसल्याची बाब लक्षात येताच श्री संत गजानन महाराज गौरव गाथा समितीचे अध्यक्ष जयंत मामीडवार यांच्या पुढाकारात कर्णयंत्र मिळाल्याने तो वृद्ध ऐकूही लागला.
ठळक मुद्देश्री संत गजानन गौरव गाथा : समितीमुळे ‘तो’ वृद्ध ऐकूही लागला