शंकरपूर : येथून जवळच असलेल्या चकजाटेपार येथील सरपंचाची बनावट सही मारून ग्रामसेवकाने पैसे काढण्याचा प्रयत्न केला. परंतु सहीमध्ये तफावत आल्याने बँकेने तो चेक विड्रॉल केलेला नाही. याबाबत सरपंचाकडून तक्रार दाखल करण्यात येणार असल्याची माहिती आहे.
चकजाटेपार गट ग्रामपंचायत असून डोंगरगाव, चकजाटेपार, चकलोहारा या तीन गावांमिळून ग्रामपंचायत बनलेली आहे. या ग्रामपंचायतमध्ये सात सदस्य असून सरपंचपदी रामकला चौधरी विराजमान आहेत. जवळपास या गावची लोकसंख्या एक हजार आहे. या ग्रामपंचायतमध्ये ग्रामसेवक म्हणून व्ही. जी. राठोड कार्यरत आहे. त्यांनी १३ सप्टेंबरला विदर्भ कोकण ग्रामीण बँकेमध्ये मनरेगाच्या खात्यातील ९८ हजार रुपयांचा चेक दिला. बँकेने सही तपासली असता त्यांच्या बँकेत असलेली सही आणि चेकवर असलेली सही यामध्ये तफावत आढळल्याने त्यांनी तो चेक रद्द केला. परंतु तो चेक पास करण्यासाठी ग्रामसेवकाच्याच मोबाईलवरून ‘मी सरपंच बोलतोय ती सही माझीच आहे, त्यामुळे पैसे देऊन टाका, असेही बँक व्यवस्थापकांना सांगण्यात आले. मात्र बँक व्यवस्थापकांना शंका आली. त्यामुळे बँक व्यवस्थापकांनी थेट सरपंच यांना फोन लावून विचारणा केली तेव्हा सरपंचांनी सांगितले की अशा कोणत्याही चेकवर मी सही केलेली नसून ते पैसे देण्यात येऊ नये. त्यानंतर तो चेक बँक व्यवस्थापकांनी रद्द करून टेबलवर ठेवला असता ग्रामसेवकांनी तो चेक घेऊन पळ काढला. या प्रकारानंतर ग्रामसेवक अद्याप कार्यालयात आले नाहीत. प्रतिक्रिया घेण्यासाठी भ्रमणध्वनी केला असता तो स्वीच ऑफ होता.
कोट
बँकेकडे चेक आला. त्या चेकवरील सरपंच यांची सही जुळली नाही. तसेच इतर व्यक्तीचे फोन आल्याने मी थेट सरपंच यांना फोन लावून विचारणा केली. परंतु त्यांनी सही केली नसल्याचे सांगितल्याने तो चेक रद्द करण्यात आला.
-प्रकाश जिचकार, व्यवस्थापक विदर्भ कोकण ग्रामीण बँक शंकरपूर.
कोट
दहा दिवसांपासून मुलगी नागपूरला भरती असल्याने मी नागपूर येथेच आहे. माझ्या अनुपस्थितीत ग्रामसेवकांनी माझी सही मारून पैसे काढण्याचा प्रयत्न केला. याबाबत मी सोमवारी तक्रार दाखल करणार आहे.
-रामकला चौधरी, सरपंच चकजाटेपार.