साहित्य व नाटकातून समाजजागृती करणाऱ्या कलावंतांना उतरत्या वयात सन्मानाने जगता यावे, यासाठी शासनातर्फे राष्ट्रीय, राज्य व जिल्हा स्तरावरील कलावंतांना विशिष्ट मानधन देण्यात येते असते. याच आधारे त्याचा उदरनिर्वाह होत असतो. चंद्रपूर व गडचिरोली जिल्हा झाडीपट्टी रंगभूमी नाटकासाठी प्रसिद्ध आहे. दरवर्षी चंद्रपूर जिल्ह्यात नाटकातून १२० कोटींची उलाढाल होत असते. त्यामुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कलावंत, स्थानिक लेखक, दिग्दर्शक, गायक, वाद्यकलावंत आहेत. शासनाकडून मानधन मिळणारे जवळपास शंभर जिल्हा पातळीवरील कलावंत व साहित्यिक आहेत. त्यांना २२५० रुपये मासिक मानधन देण्यात येते; मात्र मागील नोव्हेंबर २०२० ते जानेवारी २०२१ अशा तीन महिन्यांचे मानधन थकीत आहे. कोरोनामुळे आर्थिक अडचण असताना मानधन थकीत असल्याने वृद्ध कलावंतांची मोठी ओढाताण होत आहे. त्यामुळे थकीत मानधन त्वरित द्यावे, अशी मागणी होत आहे.
बॉक्स
झाडीपट्टीतील नाटके बंद
कोरोनामुळे नाटके बंद असल्याने नाटकातील कलावंतांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे त्यांनासुद्धा आर्थिक मदत देण्यात यावी, यासंदर्भात राष्ट्रवादीच्या चित्रपट, साहित्य कला व सांस्कृतिक विभागातर्फे संबंधित विभागाला निवेदन देण्यात आले आहे. जिल्ह्यात झाटीपट्टीमध्ये दरवर्षी कोट्यवधीची उलाढाल नाटकातून होते; मात्र यंदा कोरोनामुळे संपूर्ण झाटीपट्टीतील नाटके बंद आहेत. त्यामुळे नाटकावर अवलंबून असणारे इतर कलावंतांनाही झळ बसत आहे. त्यामुळे त्यांना मदतीची गरज आहे.
----
कोरोनामुळे मानधन थकल्याने वृद्ध साहित्यिक व कलावंतांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे त्यांना थकीत मानधन त्वरित द्यावे, तसेच नाटकांवर अवलंबून असलेल्या सर्व छोट्या-मोठ्या कलावंतांना आर्थिक मदत करण्यात यावी.
-संजय वैद्य, विदर्भ अध्यक्ष चित्रपट, साहित्य कला व सांस्कृतिक विभाग.
----
कोरोनामुळे नाट्य कलावंत व दिग्दर्शक नाट्यकला सादरीकरणापासून वंचित आहेत. त्यामुळे उदरनिर्वाहाची समस्या बिकट झाली आहे. कलावंत इतर कामे करू शकत नाही. त्यामुळे कलेवर जगणाऱ्या कलावंतांना शासनाने मदतीचा हात पुढे करणे गरजेचे आहे.
-प्रा. डॉ. श्याम मोहोरकर, ग्रामीण जिल्हाध्यक्ष सांस्कृतिक आणि कला विभाग.