आझाद बागेच्या निविदेत घोळ
By admin | Published: July 30, 2016 01:38 AM2016-07-30T01:38:13+5:302016-07-30T01:38:13+5:30
चंद्रपूर महानगरपालिकेच्या अखत्यारित असलेल्या आझाद बागेच्या निविदेमध्ये मोठ्या प्रमाणात घोळ
प्रधान सचिवांकडे तक्रार : नागरकरांचा पत्रपरिषदेत आरोप
चंद्रपूर : चंद्रपूर महानगरपालिकेच्या अखत्यारित असलेल्या आझाद बागेच्या निविदेमध्ये मोठ्या प्रमाणात घोळ झाल्याचा आरोप स्थायी समितीचे माजी सभापती व नगरसेवक नंदू नागरकर यांनी पत्रकार परिषदेत केला. या निविदा प्रक्रियेत कमी रकमेच्या कंत्राटदाराला डावलून जादा रकमेच्या कंत्राटदाराला कंत्राट देण्यात आल्याचाही आरोप त्यांनी केला. या संदर्भात नगरविकास मंत्रालयाच्या प्रधान सचिवांकडे तक्रार करण्यात आल्याची माहितीही नागरकर यांनी दिली.
यावेळी नागरकरांनी सांगितले की मनपाने बगिचा विकसित करण्यासाठी सुरुवातीला सहा कोटी रुपयांचे अंदाजपत्रक तयार केले. तत्कालीन आयुक्त सुधीर शंभरकर यांनी नंतर अंदाजपत्रकात उपाययोजनांचा समावेश केला. सुधारणेनंतर तीन कोटींनी कमी अंदाजपत्रकावर निविदा मागविण्यात आल्या होत्या. नंतर या निविदा रद्द केल्या. त्यानंतर दुसऱ्या दिवशी निविदा मागविताना बगिचा विकसित करणे, पाच वर्ष देखभाल दुरुस्ती आणि दोन वर्ष डिफ्लेक्ट लॉयबिलीटी पिरीयड असे ठरविण्यात आले. यासाठी मे. खळतकर कंन्स्ट्रक्शन नागपूर, मे. विजय आर. घाटे इंजिनिअर कॉन्ट्रक्टर चंद्रपूर, मे. प्रशांत कॉन्ट्रक्टर कंपनी नागपूर यांच्या निविदा प्राप्त झाल्या होत्या.
यातील कमी दराच्या निविदा मंजूर करण्याच्या सूचना स्थायी समितीला करण्यात आल्या. आलेल्या निविदांपैकी मे. प्रशांत कन्स्ट्रक्शन कंपनी, नागपूर यांची निविदा कमी दराची होती. असे असतानाही ही निविदा डावलून विजय आर. घाटे यांची जादा दराची निविदा मंजूर करण्यात आल्याचा आरोप नंदू नागरकर यांनी केला आहे.
या निविदा प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करीत नागरकर यांनी या संदर्भात नगरविकास मंत्रालयातील प्रधान सचिवांकडे लेखी तक्रार केली आहे. याशिवाय मुख्यमंत्र्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांच्याही लक्षात हा प्रकार आणून दिला. त्यानंतर नगर विकास विभागाच्या सचिव मनिषा म्हैसेकर यांनी नागपूर विभागीय आयुक्तांना याबाबत चौकशी करून सात दिवसात अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहे, अशी माहितीही नंदू नागरकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.