बजरंगने रुद्रा, कंकझरी, मोगलीसह छोटा मटकाशीही घेतला होता पंगा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2023 10:46 AM2023-11-16T10:46:07+5:302023-11-16T10:46:07+5:30
ताडोबाच्या अलीझंझा परिसरात आता पर्यटकांना जाणवणार उणीव
राजकुमार चुनारकर
चिमूर(चंद्रपूर) : ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात गेल्या १२ वर्षांपासून पर्यटकांना भुरळ घालणाऱ्या बजरंग नावाच्या वाघाचा मंगळवारी छोटा मटकासोबत झालेल्या झुंजीत मृत्यू झाला. बजरंगच्या आयुष्यात डोकावून बघितले तर तो वयाच्या दुसऱ्या वर्षांपासूनच अन्य वाघांशी भिडत होता. बजरंगच्या २०११ पासून पाच झुंजी झाल्या. यामध्ये पहिली रुद्रा, दुसरी कंकाझरी, तिसरी मोगली आणि चवथी झुंज छोटा मटकाशी झाली होती. या तिनही झुंजीत बजरंगने वर्चस्व गाजवले होते. मात्र पाचवी झुंज पुन्हा छोटा मटकासोबत झाली. यावेळी मात्र बजरंग १४ वर्षांचा होता. यामध्ये त्याला आपला जीव गमवावा लागला. संघर्षातून ताडोबा पर्यटकांना भुरळ घालणाऱ्या बजरंगची उणीव ताडोबात जाणवणार आहे.
ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील कारवा वनपरिक्षेत्रात कोळसा भागातील कुवानी वाघिणीचा बजरंग हा बछडा होता. बजरंगने कोळसा, कारवा जंगलात आपल्या आई कुवानी या वाघिणीकडून शिकारीसह अनेक डावपेचांचे धडे घेतले होते. दोन वर्षांचा असताना २०११ मध्ये ताडोबा कोअरमध्ये त्याची रुद्रा नावाच्या वाघासोबत गाठ पडली. या झुंजीत तो वरचढ ठरला. यानंतर तेथेच त्याने बस्ताण मांडले. अशातच मदनापूर बफर जंगलात कंकाझरी वाघासोबत अस्तित्वासाठी झुंज झाली. यामध्ये तो जिंकला आणि तेथेच वास्तव्यही करू लागला. ताडोबा कोअरमधील पांढरपौनी भागात बजरंगला छोटा मटका व मोगली या दोन वाघांसोबतही अस्तित्वासाठी झुंज द्यावी लागली. यानंतर बजरंग खडसंगी बफर क्षेत्रातील अलिझंझा, रामदेगी जंगलात वास्तव्यास आला. या परिसरात बबली व भानुसखिंडी वाघिणीचे वास्तव्य आहे, तर सोबतच छोटा मटका वाघाचेही वास्तव्य आहे. कोळसा जंगलातून सुरू केलेल्या एका तपाच्या प्रवासात बजरंगने आपल्या उमेदीच्या काळात रुद्रा, कंकाझरी मेल, छोटा मटका व मोगलीसोबत चार हात करून आपले वर्चस्व ताडोबात गाजविले. बजरंग अनेक पर्यटकांचा आवडता झाला होता.
वाढते वय आणि डावपेच कमी पडले
एकेकाळी छोटा मटका सोबतच दोन हात करून आपले अधिराज्य गाजविणाऱ्या बजरंगचे वय वाढले होते. यामुळे त्याचे डावपेच कमी पडल्याने मंगळवारी खडसंगी बफर क्षेत्रातील वाहानगाव शिवारात छोटा मटकासोबतच्या झुंजीत त्याला मात देता आली नाही. ही झुंज त्याची अखेरची ठरली. बजरंगचा एक तपाचा संघर्ष येथेच संपला.