बल्लारपूर बसस्थानक बनले ‘सेल्फी’स्थळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2019 11:50 PM2019-02-28T23:50:30+5:302019-02-28T23:53:26+5:30
बल्लारपुरातील नवीन बसस्थानक स्थळ तेथील भव्यता आणि देखणेपणा, यामुळे साऱ्यांच्याच आकर्षणाचे केंद्र बनले आहे. सोबतच, सेल्फी काढणाऱ्यांचे आवडीचे स्थानही झाले आहे.
वसंत खेडेकर।
लोकमत न्यूज नेटवर्क
बल्लारपूर : बल्लारपुरातील नवीन बसस्थानक स्थळ तेथील भव्यता आणि देखणेपणा, यामुळे साऱ्यांच्याच आकर्षणाचे केंद्र बनले आहे. सोबतच, सेल्फी काढणाऱ्यांचे आवडीचे स्थानही झाले आहे.
डोळ्यात सामावू शकणार नाही, एवढी भव्य आणि प्रशस्त इमारत, त्यावरील आकर्षक रंगसंगतीमय रंगोटी, नयनरम्यता आणि चकचकीतपणा, आत सर्वत्र मनमोहक सजावट आणि भिंतीवर वन्यप्राण्यांची मनोहारी चित्र, प्रवाशांना बसण्याकरिता स्टीलचे मोठ्या संख्येतील चकचकीत बेंचेस आणि बसेस उभे राहण्याकरिता सोयीची फलाट हे वर्णन आहे.
बल्लारपुरातील बदललेल्या बसस्थानकाने या बसस्थानकाला आता बसस्थानक म्हणावे की एअर पोर्ट असा संभ्रम निर्माण व्हावा अशी ही इमारत हायफाय झाली आहे. ती चर्चेचा विषय ठरली आहे. आता, अशा स्थळावर सेल्फी काढण्याचा मोह न झाला, तर नवल! बसस्थानक पूर्णत: तयार झाले आहे. त्याचे लोकार्पण होणे तेवढे बाकी आहे. परंतु, त्या आधीच हे चकचकीत बसस्थानक बघणाºयांची व बसस्थानकातील विविध भागात उभे राहून सेल्फी काढणाºयाची रिघ लागली आहे. सेल्फी काढणाºयात महाविद्यलयीन मुला-मुलींचा भरणा अधिक दिसून येतो. बल्लारपूर शहरात पहिले नाममात्र बसस्थानक (फक्त एक शेड) राजेंद्र प्रा. शाळेजवळ रोडला लागून होते. शहरात मध्यभागी, सोययुक्त बसस्थानक व्हावे, याकरिता प्रयत्न झाले. तत्कालीन नगराध्यक्ष जैनुद्दीन जव्हेरी यांच्या पुढाकाराने, या जागेची बसस्थानकारिता निवड करून तेथे बसस्थानक १९८६ ला झाले. गतवर्षी त्याचे भूमिपूजन झाले व नवीन इमारत आकाराला आली असून ती आकर्षणाचे केंद्र बनले आहे. या इमारतीकडे बघितल्यावर क्षणभर डोळे भरून पाहण्याचा मोह आवरत नाही.