सचिन सरपटवार
भद्रावती : भद्रावती तालुका कोरोनाचा हॉटस्पाट बनण्याच्या मार्गावर आहे. भद्रावती तालुक्यात आजपर्यंत एकाच दिवशी कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण निघाल्याचा आकडा १७६ इतका आहे. मुख्य म्हणजे हा आकडा झपाट्याने वाढत आहे. तालुक्यात नंदोरी, काटवल भगत, चंदनखेडा, देऊळवाडा, मुधोली ही गावे हॉटस्पॉट ठरली असून, शहरात पंचशील नगर, राहुल नगर, बाजार वॉर्ड, झाडे प्लॉट, गवराळा हा परिसर हॉटस्पॉट ठरला आहे.
तहसील कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, २९ एप्रिलपर्यंत ४५ वर्षांवरील तसेच पहिला व दुसरा डोस झालेल्या एकूण १९ हजार २६९ जणांचे लसीकरण झाले आहे. तसेच शहर व खेडे भागात कोरोनामुळे एकूण ५४ जणांचा मृत्यू झाला आहे.
कोरोना विषाणूचे आव्हान आहे; पण कोणतेही आव्हान पेलायचे असेल तर मनात भय ठेवून चालणार नाही आणि यासोबतच आक्रमणाइतकाच बचावही महत्त्वाचा असतो. या गोष्टींचा विचार करून भद्रावतीकरांनी यासमोर वागणे आवश्यक आहे.
भाजी बाजारातील गर्दी एखाद्या जत्रेसारखी असते. काही दिवस भाजीलासुद्धा पर्याय म्हणून कडधान्याचा वापर करणे आवश्यक आहे. येथील कोविड सेंटरमध्ये रुग्णांसाठी कपडे, जेवणाचा डबा व इतर वस्तू घेऊन जाताना नातेवाइकांकडून कोरोना नियमांची पायमल्ली होताना दिसून येते. डिस्पोजलमध्ये साहित्य दिल्यास तसेच साबण व इतर वस्तू दिल्यास त्याच ठिकाणी त्यांना कपडे धुणे सोयीचे होऊ शकते आणि यामुळे नातेवाइकांचा रुग्णांशी संपर्कही येणार नाही. कोरोना टेस्टसाठी गेल्यावर तो रिपोर्ट येईपर्यंत सदर व्यक्ती घरातच राहते. ही व्यक्ती गृह विलगीकरणमध्ये राहणे आवश्यक आहे; पण तसे होताना दिसून येत नाही. तसेच या व्यक्तीसोबत दवाखान्यामध्ये जाणारासुद्धा आपल्याला काहीच झाले नाही, या आविर्भावात राहतो. हीच गोष्ट घातक ठरत असल्याचे चित्र आहे.
बॉक्स
नागरिक अजूनही गंभीर नाही
भद्रावती तालुक्यातील तसेच शहरातील आरोग्य कर्मचारी, पोलीस, डॉक्टर, नगरपरिषद कर्मचारी हे २४ तास जिवाचे रान करीत आहेत. लॉकडाऊनही वाढले आहे; पण ज्या नागरिकांसाठी इतकी काळजी घेण्यात येत आहे, त्या नागरिकांच्या दैनंदिनीत अजून कोणताही फरक न पडल्याचे लक्षात येत आहे. वॉर्डातील मुले बगीच्यात खेळताना दिसत आहेत. नागरिकांचे एकत्र येणे, तसेच गप्पा चालूच आहेत. लोकांनी आपले वागणे बदलले नाही तर लॉकडाऊन वाढवूनही उपयोग होणार नाही.
बॉक्स
लक्षणे असूनही चाचणी नाही
अनेक जण कोरोनाची लक्षणे जाणवत असतानाही कोरोना चाचणी करीत नाहीत. स्वतः डॉक्टर बनून औषध घेतात. त्यानंतर डॉक्टरचा सल्ला घेतात; पण तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते.
या ठिकाणी गृह विलगीकरण झालेले अनेक रुग्ण त्यांच्या परिसरात तसेच रस्त्यावर बिनधास्त फिरताना दिसत आहेत. घरावर स्टिकरही लावू देत नाहीत. यापुढे अशा नागरिकांवर एफआयआर दाखल करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.
बॉक्स
मनात भीती ठेवू नका
या सगळ्या गोष्टींवर मात करून प्राथमिक स्टेजलाच तपासणी करा, ऑक्सिमीटर, थर्मामीटर घरीच ठेवा, कोरोना संबंधित लक्षणे जाणवल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या, मास्क व सॅनिटायझरचा वापर करा तसेच मनात कुठल्याही प्रकारची भीती बाळगू नका, असे आवाहन नगराध्यक्ष अनिल धानोरकर, तहसीलदार महेश शितोळे, नगर परिषद मुख्याधिकारी सूर्यकांत पीदुरकर यांनी केले.