साईनाथ कुचनकारचंद्रपूर : विधानसभा निवडणुकीला वर्षभराचा कालावधी आहे. मात्र, भारतीय जनता पक्षाने आतापासून जोरदार तयारी सुरू केली असून, चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व विधानसभा क्षेत्रातील प्रमुखांची नावे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीर केली आहेत.
ही नावे जाहीर केली तरी जिल्ह्यात सर्वांच्या नजरा वरोरा विधानसभा क्षेत्रातील प्रमुखाकडे गेल्या आहेत. मागील विधानसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून निवडणूक लढविलेले रमेश राजूरकर यांची वरोरा विधानसभा प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. मनसेला मोठा धक्का असला तरी राजूरकर यांनी भाजपत केव्हा प्रवेश घेतला, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
भाजपने जाहीर केलेल्या विधानसभा प्रमुखांमध्ये देवराव भोंगळे (राजुरा), रामदास आंबटकर(चंद्रपूर), चंदनसिंह चंदेल(बल्लारपूर), अतुल देशकर(ब्रह्मपुरी), गणेश तळवेकर(चिमूर) आणि रमेश राजूरकर(वरोरा) यांचा समावेश आहे.जाहीर केलेल्या प्रमुखांमध्ये देवराळ भोंगळे यांच्याकडे राजुरा, ब्रह्मपुरी अतुल देशकर, वरोरा रमेश राजूरकर यांना देण्यात आल्याने याच नावाकडे विधानसभेतील संभाव्य उमेदवार म्हणूनही बघितल्या जात आहे.
विशेष म्हणजे, रमेश राजूरकर यांनी २०१९ ची विधानसभा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून लढविली होती. या निवडणुकीमध्ये त्यांनी ३३ हजारांवर मते घेतली. दरम्यानच्या काळामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राजूरकर यांच्या वरोरा येथील निवासस्थानी भेट सुद्धा दिली होती. मात्र, राजूरकर यांचे मनसेमध्ये मन रमत नसल्याची चर्चा होती. त्यातच भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठांनी राजूरकर यांच्यासोबत संपर्क वाढविला. त्यामुळे ते भाजपमध्ये जातील, अशी शक्यता व्यक्त केली जात होती.
दरम्यान, बुधवारी भाजपने जाहीर केलेल्या प्रमुखांच्या यादीमध्ये वरोरामध्ये त्यांचे नाव असल्याने त्यांचा पक्षप्रवेश पक्का झाल्याचे दिसून येते. विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वीच ते भाजपमध्ये वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत प्रवेश करणार होते. मात्र, काही अडचणीमुळे त्यांचा पक्ष प्रवेश कार्यक्रम टळला. येत्या काही दिवसांमध्ये ते जाहीर सभेमध्ये कार्यकर्त्यांसोबत भाजपचा झेंडा हातात घेणार आहेत.
मागील काही दिवसांपासून भाजपचे वरिष्ठ नेते संपर्कामध्ये होते. दरम्यान, जाहीर झालेल्या विधानसभा प्रमुखांमध्ये आपले नाव असल्याचे कळले. भारतीय जनता पार्टीने आपल्यावर नवीन जबाबदारी दिली आहे. ती जबाबदारी समर्थपणे पार पाडण्याचा आपला प्रामाणिक प्रयत्न राहील. कार्यकर्त्यांसमवेत लवकरच जाहीर कार्यक्रमाध्ये पक्षप्रवेश घेण्यात येईल.- रमेश राजूरकर,भाजप, वरोरा विधानसभा प्रमुख.