निवडणूक : नगराध्यक्षपदी योगिता बनपूरकर तर उपाध्यक्षपदी रश्मी पेशने ब्रह्मपुरी : नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत शनिवारी भाजपला जोरदार धक्का बसला आहे. बहुमताचे संख्याबळ असतानाही नगराध्यक्षपदाने भाजपला हुलकावणी दिली. केवळ एकमेव सदस्य असलेली काँग्रेस राजकीय डावपेचातून सत्तेत सहभागी झाली आहे. नगरपरिषदेच्या सभागृहात शनिवारी पार पडलेल्या नगराध्यक्ष व उपाध्यक्षपदी स्वतंत्र विकास आघाडीच्या योगिता विजय बनपूरकर तर उपाध्यक्षपदी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या रश्मी पेशने १० विरूद्ध ८ मतांनी विजय झाल्या आहेत. ब्रह्मपुरी नगरपरिषदेच्या पुढील अडीच वर्षासाठी ओबीसी महिला आरक्षण नगराध्यक्षासाठी होते. त्यानुसार भाजपाकडून अनघा दंडवते तर स्वतंत्र विकास आघाडीकडून योगिता बनपूरकर यांनी उमेदवारी दाखल केली होती. मात्र या निवडणुकीत योगिता बनपूरकर यांना १० मते तर अनघा दंडवते यांना ८ मते प्राप्त झालीत. त्यात योगिता बनपूरकर विजयी झाल्या. उपाध्यक्षपदासाठी स्वतंत्र विकास आघाडी व भारतीय राष्ट्रीय काँग्रेस युतीच्या रश्मी पेशने यांनी भारतीय जनता पार्टीच्या डॉ. हेमलता नंदूरकर यांचा पराभव केला आहे. निवडणूक पिठासीन अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी उमेश काळे तर सहनिवडणूक अधिकारी म्हणून नगर परिषद मुख्याधिकारी मंगेश खवले यांनी कामकाज पाहिले. (तालुका प्रतिनिधी) संख्याबळ भाजपाचे तरीही पराभव भाजपाचे सर्वाधिक १० नगरसेवक आहेत. यापूर्वीच्या अडीच वर्षांत भाजपाची सत्ता होती. परंतु भाजपाचे विद्यमान सभापती विक्रम कावळे व महिला सभापती स्वर्णलता बडोले अनुपस्थित राहिल्याने भाजपाचा पराभव झाला. स्वतंत्र विकास आघाडीची यशस्वी खेळी स्वतंत्र विकास आघाडीचे संयोजक तथा प्रथम नगराध्यक्ष अशोक भैया व त्यांचे कार्यकर्ते भाजपातील नाराजीचा फायदा उठवून सत्ता प्राप्त करण्यात यशस्वी झाले. त्यामुळे नगरपरिषदेत सत्ता परिवर्तन भाजपाच्या जिव्हारी लागले आहे. आघाडीच्या कार्यकर्त्यांचे अथक परिश्रम खेमराज तिडके, अॅड. मनोहर उरकुडे, गनी खान, राकेश कऱ्हाडे, सुरेश करंबे, मोरेश्वर पत्रे, इनायतखॉ पठान, वासू सौदरकर, ईश्वर ठाकरे व अन्य कार्यकर्त्यांच्या अथक परिश्रमाने विजय खेचून आणल्याने कार्यकर्त्यांच्या घोषणाबाजीने परिसर हादरून गेला होता. आमचे प्रेरणास्रोत अशोक भैय्या यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व नगरसेवकांना सोबत घेऊन शहराचा विकास करण्यासाठी कटिबद्ध राहणार आहे. - योगिता बनपूरकर, नगराध्यक्ष, ब्रह्मपुरी अंतर्गत मतभेद विसरून एक झालो आहोत. स्वतंत्र विकास आघाडी काँग्रेसचा एक भाग आहे. विरोधकांना साधे नगरसेवक सांभाळता येत नाही तर पुढे राज्य व देश यांच्या विरोधात आहे, हे या निकालावरून दिसून आले आहे. - विजय वडेट्टीवार, आमदार, ब्रह्मपुरी-सावली
ब्रह्मपुरीत भाजपला जोरदार धक्का, सत्तापालट
By admin | Published: July 31, 2016 1:44 AM