घोडाझरीने टाकली कात
By admin | Published: July 31, 2016 12:48 AM2016-07-31T00:48:31+5:302016-07-31T00:48:31+5:30
पूर्व विदर्भात एक उत्तम पर्यटनस्थळ म्हणून प्रसिद्ध पावलेल्या घोडाझरीने आणखी कात टाकली आहे.
बोटिंगचा आनंद : निवास व इतर सुविधांची रेलचेल
नागभीड : पूर्व विदर्भात एक उत्तम पर्यटनस्थळ म्हणून प्रसिद्ध पावलेल्या घोडाझरीने आणखी कात टाकली आहे. घोडाझरीत अनेक महत्त्वपूर्ण सुधारणा करण्यात आल्या असून या सुधारणा पर्यटकांना भूरळ घालत आहेत.
तसेही घोडाझरीचे नैसर्गिक सौंदर्य पर्यटकांना भूरळ घालणारेच आहे. तिन्ही बाजुला नैसर्गिक टेकड्या असल्याने एका बाजूला बांध घालून इंग्रजांनी या तलावाची निर्मिती १९०५ मध्ये केली. तलावाची निर्मिती केली त्यावेळी परिसरातील शेतकऱ्यांना सिंचन उपलब्ध व्हावे, अशी इंग्रजांची कल्पना असावी. पण आता हे तलाव नागभीड - सिंदेवाही या तालुक्यातील हजारो हेक्टर शेतीस सिंचन तर उपलब्ध करून देतच आहे. पण त्याच बरोबर हे तलाव पूर्व विदर्भातील एक प्रमुख पर्यटन स्थळ म्हणून नावारूपास आले आहेत. म्हणूनच वर्षभर नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आदी जिल्ह्यातील पर्यटक भेट देत असतात. या जिल्ह्यातील शाळांच्या सहलीही येत असतात.
सद्यस्थितीत घोडाझरीच्या व्यवस्थापनाने घोडाझरीत आणखी नव्याने अनेक सोयी उपलब्ध केल्या आहेत. यात विविध प्रकारच्या बोटिंगचा समावेश आहे. आकर्षक रंगरंगोटी करण्यात आली आहे. आतापर्यंत नसलेली निवासाची व्यवस्था आता उपलब्ध करण्यात आली आहे.
आधीच वृक्षवेलींनी बहरलेल्या बगिच्यात आकर्षक झाडांची लागवड करण्यात आली आहे. विशाल अशा तलावाचा आणि त्यासमोरील हिरव्या गर्द वनराईमध्ये बसून तिचा मनमुराद आनंद लुटता यावा, यासाठी गवताच्या झोपड्यांची निर्मिती करण्यात आली आहे.
घोडाझरीचे बदललेले हे स्वरूप खरोखर डोळ्याचे पारणे फेडणारे आहे. आता महाराष्ट्र शासनाच्या वन विभागाकडून ‘इको टुरिझम’ म्हणून घोडाझरीचा संपूर्ण जंगल परिसर विकसित करण्यात येत आहे. वन विभागाचे हे काम अंतिम टप्प्यात आले आहे. वन विभागाच्या या इको टुुरिझमने पर्यटकांना अनासायास दुग्धशर्करा योगाचा लाभ होणार आहे. (तालुका प्रतिनिधी)
एकाच दिवशी जंगलभ्रमंती
या जंगलभ्रमंतीत जंगली पशुपक्षांचे दर्शन आणि घोडाझरीच्या नैसर्गिक सौंदर्याचे दर्शन पर्यटकांना अनुभवता येणार आहे.