नागभीड : अधिनस्थ अधिकाऱ्याने कृषी साहित्याचे वाट्टेल तसे वितरण केले. या प्रकाराने संतापलेल्या संवर्ग विकास अधिकाऱ्यांनी गोदामाला सिल लावल्याचा प्रकार येथील पंचायत समितीत गुरुवारी घडला. पंचायत समितीच्या कृषी विभागामार्फत विविध कृषी साहित्याचे वितरण करण्यात येते. यात स्प्रे पंप, कॅरेट, दरी, आदी विविध साहित्याचा समावेश आहे. या साहित्याचे गेल्या सप्ताहात कृषी विभागाच्या एका अधिकाऱ्याने वाट्टेल तसे वितरण केले. यामुळे खरे लाभार्थी दूर राहिले आणि भलत्यांनीच या साहित्याचा लाभ घेतला. ही माहिती जेव्हा येथील संवर्ग विकास अधिकारी प्रदीप बिरमवार यांना समजली, तेव्हा त्यांचा राग अनावर झाला आणि त्यांनी पंचायत समितीच्या गोदामाला सील ठोकले. आता संवर्ग विकास अधिकाऱ्यांच्या या पावलाबद्दल विविध चर्चा सुरु आहेत. संवर्ग विकास अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता ते संपर्क कक्षेच्या बाहेर होते. दरम्यान, या संदर्भात पंचायत समितीच्या एका अधिकाऱ्यांना विचारणा केली असता या प्रकाराला सिल म्हणता येणार नाही. संवर्ग विकास अधिकाऱ्यांनी पंचनामा करण्यासाठी सामान कुलूपबंद ठेवले आहे. सामानाचा पंचनामा लवकरच होणार आहे, असे सांगितले. (तालुका प्रतिनिधी)
संवर्ग विकास अधिकाऱ्यांनी गोदामाला ठोकले सील
By admin | Published: July 30, 2016 1:34 AM