चंद्रपूर : चांदाफोर्ट - गोंदिया रेल्वेमार्गावर मूलजवळ असलेल्या मारोडा रेल्वेप्लॅटफार्मच्या उंचीकरणाचे कामाचे कंत्राट दक्षिण - पूर्व मध्य रेल्वे प्रशासनाने दिले. मात्र, संबंधित कंत्राटदाराने सदर उंचीकरणाचे काम अर्धवट ठेवल्यामुळे संबंधित रेल्वे प्लॅटफार्म अपूर्ण अवस्थेत आहे. सध्या कोरोनाच्या प्रार्दुभावामुळे चांदाफोर्ट - गोंदिया ही पॅसेंजर रेल्वे बंद आहे. त्यामुळे या काळात सदर काम पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, कंत्राटदाराकडून प्लॅटफार्म उंचीकरणासाठी मातीकाम योग्य पद्धतीने न करताच काम बंद ठेवले आहे. रेल्वे प्रशासनाकडून संबंधित कंत्राटदाराकडे दुर्लक्ष होत असल्याने मारोडा रेल्वे प्लॅटफार्म उंचीकरण लांबणीवर पडल्यागत स्थिती निर्माण झाली आहे.
मूलपासून जवळच असलेल्या मारोडा येथे रेल्वे प्रशासनाने १ जुलै २०१३ रोजी रेल्वे थांबा मंजूर केला. तेव्हापासून या रेल्वेस्थानकावरून प्रवाशांचे आवागमन सुरू आहे. प्रसिद्ध पर्यटनक्षेत्र असलेले सोमनाथ, बाबा आमटे यांनी उभारलेले आमटे फॉर्म या महत्त्वाच्या ठिकाणांसह मारोडा, करवन, काटवन, छोटी कोसंबी, मोठी कोसंबी, मोरवाई, उश्राळा, भादुर्णी, पडझरी, रत्नापूर असे जवळपास १२ गावे या रेल्वेस्थानकाला जोडली गेली आहेत. सुरुवातीच्या काळात रेल्वेथांबा होता. मात्र, रेल्वे प्लॅटफार्म उंच नसल्याने अनेकदा प्रवासी रेल्वेतून चढत अथवा उतरताना अपघात घडले आहेत. महिलावर्ग व लहान मुलांना रेल्वेत चढण्या - उतरण्यासाठी मोठा त्रास सहन करावा लागत होता. अशातच रेल्वेचा थांबा काही मिनिटांचाच असल्याने प्रवाशांची लगबग वाढून अपघाताच्या घटना घडू लागल्या. त्यामुळे प्रवाशांच्या मागणीवरून मारोडा रेल्वे प्लॉटफार्मचे उंचीकरणासाठी दक्षिण - पूर्व मध्य रेल्वे प्रशासनाने मंजुरी देऊन निविदेद्वारे कंत्राट दिले. रेल्वे प्लॉटफार्मच्या उंचीकरणाचे काम सुरू झाले. मात्र, अल्पावधीतच कंत्राटदाराने हे काम सोडून दिले. सध्या रेल्वे बंद असल्याने त्याचा फारसा परिणाम दिसत नसला तरी रेल्वे सुरू झाल्यावर प्रवाशांसाठी हे अर्धवट काम मोठी डोकेदुखी ठरणार आहे. सदर काम मागील दोन महिन्यांपासून बंद आहे. यासंबंधी रेल्वे प्रशासनाने गंभीर दखल घेऊन त्वरित रेल्वे प्लॉटफार्म उंचीकरणाचे काम पूर्ण करावे, अशी मागणी परिसरातील नागरिक करीत आहेत.